
मालवण : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे यांचे मालवणात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत... महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा विजय असो अशा जयघोषात मालवण चौके, कुंभारमाठ येथे स्वागत करण्यात आले. मालवणातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या स्वागताने राज ठाकरे भारावून गेले. तर, व्यापारी संघाने राज ठाकरे यांची भेट घेत सिंधुदुर्ग वासियांना टोल माफीसह हा टोलनाका जिल्ह्याच्या सीमेवर असायला हवा होता. असे सांगत टोल प्रश्न सोडवण्याची मागणी केली. यावर राज ठाकरे यांनी या प्रश्नी आपण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.
जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे गुरुवारी सायंकाळी मालवणात आगमन झाले. त्यांच्या दौऱ्याची माजी आमदार परशुराम उपरकर, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर यांनी दौऱ्याची जय्यत तयारी केली होती. सायंकाळी राज ठाकरे यांचे चौके येथे आगमन झाले. चौके येथे मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोल ताशांच्या गजरात तालुकाध्यक्ष विनोद सांडव यासह मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले.
जानकी हॉटेलचे मालक विनय गावकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाहुणचार केला.
त्यांनतर राज ठाकरे यांचा ताफा मालवणच्या दिशेने रवाना झाला. मालवण कुंभारमाठ येथे विनय गावकर यांच्या जानकी मंगल कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सुहासिनींनी त्यांचे औक्षण केले. राज यांच्या दौऱ्याने मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, गणेश वाईरकर यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तसेच मालवण व्यापारी संघाने देखील राज ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी राज ठाकरे यांनी मालवणातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी बंद खोलीत काही वेळ चर्चा केली. मालवणातील विविध समाजिक संघटनांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले.
टोलचा प्रश्न सोडवा :
यावेळी व्यापारी संघाने राज ठाकरे यांची भेट घेत टोल प्रश्न सोडवण्याची मागणी केली. सदरचा टोल नाका हा जिल्ह्याच्या सीमेवर असायला हवा होता. त्यामुळे यात आपण लक्ष घाला, अशी मागणी केली. यावेळी राज ठाकरे यांनी मी तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.
भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करा :
मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बोर्डीग ग्राऊंडवर याच महिण्यात भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचे आदेश दिले. या स्पर्धेला स्वतः आपण आणि अमित ठाकरे येणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच रात्री देवबाग येथे या संदर्भात राज ठाकरे यांनी पुन्हा स्वतः हॉटेलवर पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. स्पर्धा भव्य दिव्य होण्यासाठी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनाही कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले.
उद्या आंगणेवाडीत भराडी देवीचे घेणार दर्शन :
शुक्रवारी सकाळी राज ठाकरे हे आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते कणकवलीला रवाना होणार आहेत अशी माहिती मनसेने दिली आहे.