
मंडणगड : मागील तीन दिवसापासून तालुक्यात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऑगस्ट महिन्यात काहीशी उसंत घेणारा पाऊस दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून दररोज किमान शंभर मिलीमीटर वा त्याहुन अधिकची सरासरी गाठत आहे. १८ ऑगस्ट २०२५ अखेर तालुक्यात 2111.80 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या 56.76 टक्के इतका पाऊस पडून गेला आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे भारजा नदीच्या पाण्याची पातळी पाडल्याने मांदिवली चिंचघर गावांना जोडणाऱ्या पुलावरुन यंदाचे हंगामात तिसऱ्या वेळेस पाणी गेले आहे. त्यामुळे या मार्गाने केळशी व मंडणगड येथे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सुर्ले येथील निवळी नदीवरील मंडणगड व सुर्ले या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावरुन पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. भिंगळोली डेपो ते समर्थनगर दापोली फाटा दरम्यानचे अंतरात मुख्य रस्त्यावर पाणी भरले तालुक्यातील भारजा निवळी सावित्री या मुख्य नद्यासह सर्वच लहान मोठ्या ओढ्यांची पातळी पावसामुळे वाढली आहे. सोमवारी अतिवृष्टीचा ऑरेंज ॲलर्ट असल्याने शाळा महाविदयालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तालुक्यात पावासाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण करण्याचे काम महसुल विभागाचेवतीने सुरु करण्यात आले आहे.