वैभववाडीत पावसाने झोडपले !

नापणेत घरावर झाड पडून नुकसान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 15, 2023 20:22 PM
views 75  views

वैभववाडीः  तालुक्यात आज (ता.१५) सायंकाळी वादळी वारा व वीजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.वादळामुळे नापणे जैतापकरवाडी येथील एका घरावर झाड पडून घराचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. सायंकाळी उशीरापर्यंत तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. 

    गेले दोन दिवस तालुक्यातील वातावरणात बदल झाला होता. उष्मा वाढला होता व  ढगाळ वातावरण तयार झाले होते.त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता अधिक होती.अखेर आज सायंकाळी तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्टयातील गावात जोरादार पाऊस झाला. वीजांच्या गडगडाटासह झाल्याले पावसाने सर्वांची एकच तारांबळ उडाली. या पावसाने नापणे कोकाटेवाडी येथील अंजली अनंत खाडये यांच्या घरावर झाड पडले.यात घराचे  सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले.घटनास्थळी नापणे सरपंच प्रदीप जैतापकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

    तालुक्यात सध्या काही ठिकाणी भात कापणीला सुरुवात झाली. या पावसाने कापणीच्या कामात व्यत्यय आला.तसेच ब-याच ठिकाणी पावसामुळे शेतीचे नुकसान देखील झाले.