
रोहा : गेली चार दिवसांपासुन रिपरिप सुरु असलेल्या पावसाने रात्री अचानक जोर धरल्यामुळे रोहेकरांची पावसाने अक्षरशः झोप उडवली.सबंध रोहा तालुक्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घालून रात्रभर झोडपून काढलेल्या पावसामुळे कुंडलीका नदीने मात्र धोक्याची पातळी ओलांडली आणि नदी दुथडी भरून वाहू लागली.कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने ठिक ठिकाणी पाणी साचले.कुंडलिका नदीचे पात्र ओसंडून वाहत असल्यामुळे कोलाड,आंबेवाडी,धाटाव, वरसे विभागात अनेक ठिकाणी नदीचे पाणी भरल्याचे पहावयास मिळाले.या पाण्याच्या प्रवाहात अनेक ठिकाणि भात लावणी झाल्यामुळे शेती वाहून जाईल या भीतिने बळीराजा धास्तावल्याचे पहावयास मिळाले तर धाटाव औद्योगिक वसाहती अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालेले दिसून आले.मात्र कामगार वर्गाला पहिल्या पाळीत कामावर जाणे मुश्किल झाल्याने अनेकांनी घरी राहणे पसंत केले.
मागील २४ तासात भिरा येथे ४५५ मी.मी तर कोलाड येथे २७५ मी.मी पावसाची नोंद झाली असल्याने सकाळी ८.३० वाजता भिरा येथील धरणाची पाणी पातळी ९४.५८मी झाली. त्यामुळे गेट नं १- ७५ से.मी.,गेट नं २- ५० से.मी.तरगेट नं ३- ५० से.मी.पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे समजते.त्यामुळे रोह्यातील कुंडलिका नदीच्या जुन्यापूलावरुन पाणी ओसंडून वाहु लागले तर उडदवणे,बाहे,देवकान्हे,मुठवली या १२ गावाना जोडणाऱ्या पालदाड़ पूलालाही पाणी लागले होते.धाटाव विभागातील डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा ओघ मात्र कायमच होता.कुंडलिका नदिचे पाणी धाटाव नाक्यावरील काही घरात नदीचे पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले.काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती तर पाण्यात दुचाकी,चारचाकी आणि अवजड वाहने राहिल्याने वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले.
रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगर,दऱ्यातील पाणी सखल भागात घुसले.कुंडलिका नदीने पाण्याची पातळी ओलांडल्यामुळे रोह्यासह धाटाव औद्योगिक वसाहती अंतर्गत रस्त्यांवर सुद्धा सर्वत्र पाणी साचल्यामुळे वसाहतीतील रस्ते मात्र पाण्याखाली आल्याचे पाहावयास मिळाले.तर सांडपाणी प्रक्रिया केंद्रात चेंबर वाटे जाणारे रासायनिक सांडपाणी सुद्धा या पाण्यात मिसळल्यामुळे लाल,हिरवा,पिवळा व निळ्या रंगाचे पाणी सुद्धा काही ठिकाणी पाहावयास मिळाले.वसाहती अंतर्गत नालेसफाई सुद्धा पाऊस सुरु झाल्यानंतर झाल्याने तो कचरा रस्त्यावरच राहिल्याने पावसाच्या पाण्यात सर्वत्र पसरल्याचे पहावयास मिळाले.त्यातच पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाल्यामुळेच रस्त्यावर पाणी आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.या पाण्यामुळे कामगार वर्गाला सकाळी पहिल्या पाळीत कामावर जाताना रस्ता शोधताना चांगलीच कसरत करून उशिरा हजर रहावे लागले तर काहींनी घरीच राहणे पसंत केले.
पाण्याचा प्रवाह लक्षात घेता रोह्याच्या अष्टमी पुलावरून जाणारी वाहतूक सायंकाळ पर्यंत बंद करण्यात आली होती.तर सबंध भातशेती सुद्धा प्रचंड वाहणाऱ्या पाण्याने काही ठिकाणी वाजून गेल्याचे दृश्य आहे.मात्र याच भीतीमुळे बळीराजा धास्तावला आहे.दरम्यानच्या कुंडलीकेच्या पाण्याने प्रवाह बदलून वसाहतीतील कारखान्यात गेल्याने अनेक कारखान्यातील उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले.
आज २५ जुलै रोजीच्या पाण्याने मागील २३ आणि २४ जुलै १९८९,त्यानंतर २४ जुलै २०१५ सालच्या प्रचंड असणाऱ्या पाण्याच्या आठवणी अनेकांनी बोलून दाखविल्या.सध्या पावसाने थोडी उसंत घेतली असून बऱ्यापैकी पाणी ओसरल्याचे चित्र आहे.मात्र प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात पुढील २४ तासाकरिता अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.