LIVE UPDATES

वेंगुर्ल्यात पावसामुळे ३ लाख ५५ हजारांचे नुकसान

वीज पुरवठा खंडित
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 07, 2026 16:06 PM
views 20  views
#kokansadlive#news update#konkan update#VENGURLA

वेंगुर्ले:  सोमवारी वेंगुर्ले तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांवर झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी (६ जुलै) झालेल्या या वादळी वाऱ्यासाहित पावसामुळे नागरिकांचे सुमारे ३ लाख ५५ हजारांचे नुकसान झाले असल्याची माहिती वेंगुर्ला तहसील आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान आज सायंकाळी झालेल्या सोसाट्याच्या वारा व पावसामुळे तुळस येथे विद्युत पोल पडून वीज पुरवठा खंडित झाल्याने तालुक्यातील काही भागात नागरिकांना रात्र काळोखातच काढावी लागणार आहे.  शनिवार ४ जुलै पासून सोसाट्याच्या वाऱ्याने व मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे ठिकठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नद्या, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहे. हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावर सुद्धा सोसाट्याचा वारा व पाऊस असल्याने लाटांच्या उंचीत वाढ झाली असून मोठमोठ्या लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. ताशी ३० गे ४० किमी वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे समुद्र किनाऱ्याजवळील नागरिकांना तसेच मच्छिमार बांधवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पर्यटकांनी सुद्धा समुद्राच्या पाण्यात न उतरण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. शनिवारी व रविवारी या पावसामुळे घरांवर झाडे पडून सुमारे २ लाख ८० हजारांचे नुकसान झाले होते. तर सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नवाबाग येथील संतोष जयवंत कुबल यांच्या घरावरील पत्र्याचे अंदाजे २५ हजार, नवाबाग येथील श्रीमती कृष्णा खोबरेकर यांच्या घरावर झाड पडून अंदाजे १५ हजार, मोचेमाड मधील निधी निलेश कोचरेकर यांच्या घरावरील पत्रे उडुन अंदाजे २५ हजार, मोचेमाड येथील कृष्णा रामचंद्र गावडे यांच्या दुकानावरील पत्रे उडून १० हजार, उभादांडा नमसवाडी येथील मधुसूदन अनंत साळगावकर यांचा माड पडून रामचंद्र नामदेव साळगावकर यांच्या मांगराचे व तुळशीचे अंदाजे ७५ हजार, नवाबाग येथील संतोष जयवंत कुबल यांच्या घरावरील पत्र्याचे अंदाजे २५ हजार, नवाबाग येथील श्रीमती कृष्णा खोबरेकर यांच्या घरावर झाड पडून अंदाजे १५ हजार, म्हाडाकॉलनी येथील विठ्ठल शिरोडकर  यांच्या घराचे पत्रे उडून अंदाजे २५ हजार, परबवाडा येथील सुबोध नारायण गवंडे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून अंदाजे १ लाख २५ हजार तर म्हाडा कॉलनी येथील सुशीला प्रमोद राणे यांच्या घराचे पत्रे उडून अंदाजे १५ हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासात तालुक्यात २५ मिमी तर आतापर्यंत एकूण ६५५ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती वेंगुर्ला तहसील आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.