
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मंजूर असलेल्या टर्मिनस चे काम जलदगतीने व्हावे आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून उद्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे भूमिपूजन होवून ९ वर्ष उलटून गेली तरी टर्मिनस काम झाले नाही. रेल्वेचे शिल्पकार प्रा मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने सतत प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री अशा विविध पातळ्यांवर इमेल, निवेदन द्वारे लक्ष वेधले आहे.
रेल्वे प्रवासी संघटनेने माहितीच्या अधिकारानुसार, २०२५ - २६ या आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाही नंतर (एकूण ९ महिने) सावंतवाडी स्थानकातून एकूण १२ कोटी ४६ लाख ६२ हजार २३ एवढे विक्रमी उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून रेल्वे प्रशासनाला मिळाले.हे उत्पन्न केवळ उत्पन्न नसून आमच्या मागण्या किती रास्त आहेत त्याचा जिवंत पुरावा आहे असे रेल्वे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.
नवीन गाडी, बांद्रा - मडगाव चा थांबा सावंतवाडी येथे दिल्याने सावंतवाडी स्थानकाच्या उत्पन्नात सात्यत्याने वाढ झाली. आता जानेवारीला पुन्हा नागपूर - मडगाव चा थांबा पूर्ववत झाल्याने सावंतवाडी स्थानक पुढील तीन महिन्यात कमीत कमी एकूण १६ कोटी उत्पन्न गाठेल यात तीळ मात्र शंका नाही.परंतु कोरोना काळात सावंतवाडी स्थानकात प्रवासी नाही हे कारण पुढे करून ज्या प्रकारे राजधानी एक्स्प्रेस आणि गरीब रथ एक्स्प्रेसचा सावंतवाडी थांबा काढला तो कोणत्या निकषांवर..? आणि आता एवढे प्रवासी आणि उत्पन्न असताना ते थांबे पूर्ववत होत का होत नाहीत हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. कदाचित नवीन थांबे न देता आहे ते थांबे काढून टाकायचे आणि सावंतवाडी मतदार संघातील जनतेचा अपमान करायचा हेच संबंधित प्रशासनाने ठरविले आहे का असा सवाल येथील जनतेत उपस्थित झाला आहे. त्याचाच संताप येथील जनता येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी रेल रोको आंदोलन करून व्यक्त करेल याची प्रशासनाने दखल घ्यावी, असे आवाहन केले आहे. रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांच्यासहित सर्व पदाधिकारी रेल्वे टर्मिनस साठी आग्रही भूमिका मांडत आहेत.