महावितरणच्या विरोधात 'आर या पार'चा लढा | जिल्हा वीज ग्राहक संघटनेची बैठक

Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2024 08:31 AM
views 125  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गची तातडीची बैठक 25 मे 2024 रोजी दुपारी 3.00 वा. सिद्धिविनायक हॉल कसाल येथे आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेचा खेळखंडोबा सुरू असून जिल्ह्यातील वीज ग्राहक त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसत आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहक व व्यापारी महावितरणच्या कारभाराला कंटाळले असून महावितरणच्या विरोधात "आर या पार" चा लढा देण्याची तयारी करीत आहेत. मान्सून पूर्व पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरण कशा प्रकारे काम करण्यास असमर्थ ठरले हे दाखवून देत महावितरणच्या अधिकाऱ्यांना उघडे पाडले आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराला कंटाळून वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग व व्यापारी महासंघाने पुढील दिशा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. 

यावेळी बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष ॲड.नितीन म्हापणकर (कणकवली), जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर (सावंतवाडी), जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुभाष दळवी, साईनाथ आंबेरकर, व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, आदी  पदाधिकारी, सदस्य व वीज ग्राहक बैठकीला उपस्थित होते.कसाल येथे पार पडलेल्या बैठकीत तालुका वार समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुभाष दळवी यांनी महावितरणने गेल्या दोन-तीन वर्षात दोडामार्ग तालुक्यात झाडांची छाटणी केलेली नसून महावितरणच्या बेजबाबदार कामांमुळे दोडामार्ग तालुक्यात जवळपास 30 ते 40 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. नुकसान झाल्यावर जे काम करतात तेच काम महिन्याभरापूर्वी केले असते तर नुकसान कमी झाले असते. त्याचबरोबर महावितरण व महावितरणचे ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्याने महावितरण कडून कामे पूर्ण करण्यात दिरंगाई होत आहे, असा आरोप केला. दोडामार्ग तालुक्याला तीन वर्षे पूर्वीपर्यंत महालक्ष्मी विद्युत प्रकल्पातून वीज पुरवठा केला जात होता. परंतु सदरच्या करार संपून तीन वर्षे झाली तरी महालक्ष्मी कंपनी सोबत नवीन करार न केल्याने दोडामार्ग तालुका अनेकदा अंधारातच असतो, असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

सावंतवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी वीज खांब जीर्ण अवस्थेत आहेत. नवे खांब उभे करून लाईन ओढली असता इतर चार खांब पडतात अशी बिकट अवस्था महावितरणची झाली असल्याचे संजय लाड यांनी सांगितले. त्याचबरोबर झाडी केवळ रस्त्यालगत मारली जाते, आणि लाईन्स जंगलातून जातात. त्यामुळे महावितरणची अवस्था थोड्याशा पावसात देखील बिकट होते. आमदार, खासदार, नेते, मंत्री शहर मर्यादित बैठका घेतात, गावांकडे मात्र साफ दुर्लक्ष्य होतो, असा आरोप त्यांनी केला.

कसाल येथील भगवान बालम यांनी बिले घरापर्यंत पोहचत नाहीत, गेटला लावून ठेवतात. अशी तक्रार केली. कार्यकारी अभियंता तनपुरेंकडे झाड पोलवर कलंडल्याची तक्रार 2 वर्षांपूर्वी दिली, पण आजपर्यंत कारवाई शून्य. असा आरोपही केला. आंब्रड गाव अनेक वर्षे विजेच्या समस्यांचा सामना करत असून मागील पावसाळ्यात नवीन वीज उपकेंद्र अथवा कणकवली येथून वीज जोडणी देतो असे आश्वासन वीज ग्राहक संघटना बैठकीत कार्यकारी अभियंता श्री.दिनोरे यांनी आंब्रड ग्रामस्थांना दिले होते. परंतु वर्ष लोटत आले तरी कोणतीही पावले उचलली गेली नसल्याचे आबा मुंज यांनी निदर्शनास आणून देत आम्ही महाराष्ट्रात आहोत की बिहार मध्ये हा प्रश्न पडला असल्याची खंत व्यक्त केली. एखादे काम खासदारांनी मंजूर केलं, दुसरा कोणीतरी आडवा येतो. असे सांगत 23 पोल आज पडतील की उद्या अशा परिस्थितीत आहेत याची जाणीव करून दिली. 

ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी मार्गदर्शन करताना ग्राहकांनी आपले मोबाईल नंबर वीज वितरण कडे रजिस्टर करा, ऑनलाईन नंबर वर तक्रारींची नोंद करा असे आवाहन करून मंगळवारी सकाळी 10.00 वा. कुडाळ येथे तर दुपारी 3.00 वा. कणकवली येथील कार्यकारी अभियंता यांची भेट घेणार असून तक्रार असणाऱ्या सर्वांनी तिथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी वीज हा जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा विषय म्हणून पोट तिडकीने आपण काम करतो. आपण बोलत नाही, सहन करतो म्हणून अन्याय वाढलेत. त्यामुळे व्यापारी महासंघ अधिकृत असल्याने महावितरणला महासंघाच्या नावे नोटीस बजावली असल्याचे सांगितले. त्याचबरोबर प्रीपेड मीटर येणार असून सिंधुदुर्गातील ते बसविण्याची सुरुवात होणार आहे. हा प्रीपेड मीटर बसवला तर त्याचा एकही रुपया ग्राहकांनी देऊ नये असे सांगितले. महावितरणला तंबी देताना ते पुढे म्हणाले, आम्ही वीज ग्राहकांनी प्रीपेड मीटरची मागणी केली नाही. त्यामुळे आम्ही एकही पैसा भरणार नाही. महाराष्ट्रात सर प्लस वीज निर्मिती होते असे आयोगाला सांगितले त्यामुळे लोड शेडींग बंद आहे असे भासविले जाते, पण अनधिकृत लोड शेडिंग करतात. कारण मुळातच निर्मिती कमी आहे. असेही ते पुढे म्हणाले.

या बैठकीचे प्रास्ताविक व आभार ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी मानले, बैठकीचे सर्व आयोजन साई आंबेरकर यांनी केले होते. यावेळी आंब्रड सरपंच मानसी कदम, केशव  मुंज, स्वप्नील मुंज, महेश कदम, भगवान बालम, महेश बालम, सुनील आचरेकर, सुभाष कांदळकर, पांडुरंग दळवी, दिनकर देसाई, संदीप सातार्डेकर, पंडित रावराणे(वैभववाडी) आदी वीज ग्राहक उपस्थित होते.