...अखेर गंगेत घोडं न्हालं ; मल्टिस्पेशालिटीचा प्रश्न मार्गी : मंत्री दीपक केसरकर

Edited by: विनायक गावस
Published on: June 29, 2023 17:55 PM
views 323  views

सावंतवाडी : जागेच्या प्रश्नामुळे प्रलंबित असलेला सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलाचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत सुटला आहे. सावंतवाडीतील राजघराण्याशी सामंजस्य करार करून हॉस्पिटलची नवीन इमारत उभी केली जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता थेट कामाला सुरूवात केली जाईल. सावंतवाडीकरांच्या सेवेसाठी हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहे अशी माहिती शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.


शाश्वत विकासाच्या प्रतीक्षेत गेली ५ वर्षे रखडलेला मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची माहिती आपल्या अधिकृत पेजवरून दिली आहे. ‌

आरोग्य सुविधांच्या अभावामुळे सावंतवाडीसह आजूबाजूच्या गावातील गोरगरीब रुग्णांना आजही गोवा-बाबुंळीवर अवलंबून रहावे लागतय. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मल्टीस्पेशालिटी मंजूर करून व भुमिपूजन होऊन देखील ५ वर्षात वीट रचली गेली नव्हती. जागेच्या प्रश्नांमुळे हे काम रखडलं होत. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात केसरकर कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर राजघराण व शासन यांची बैठक घेत सावंतवाडीतील राजघराण्याशी सामंजस्य करार केला. त्यामुळे आता मल्टीस्पेशालिटी प्रश्न सुटला असून हॉस्पिटलची नवीन इमारत उभी केली जाणार आहे. हे हॉस्पिटल लवकरात लवकर उभं राहून सावंतवाडीकरांची गोवावारी थांबावी अशी इच्छा सावंतवाडीकर नागरिक व्यक्त करीत आहेत.