
देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील जि.प.शाळेला प्यूरिफायर-कुलरची भेट देण्यात आला तसेच सरस्वती पूजनानिमित्त आजी-आजोबा स्नेहमेळावा देखील यावेळी उत्साहात संपन्न झाला
ग्रामस्थ, पालक आणि शाळेप्रेमींच्या मोलाच्या सहकार्यामुळे जि. प. प्रा. शाळा तळेबाजार येथे प्यूरिफायर-कुलरची स्टँड व पाण्याच्या टाकीसह जोडणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोलाचे योगदान दिले.
सरस्वती पूजनाच्या दिनी रविंद्र तेली यांच्या हस्ते या प्यूरिफायर-कुलरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच अनेक पालक उपस्थित होते. लोकसहभागातून शाळेच्या गरजा पूर्ण करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.याच दिवशी शाळेत सरस्वती पूजन, पाटी पूजन आणि आजी-आजोबा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्याला सुमारे ४० आजी-आजोबांनी उपस्थिती लावली. नातवंडांच्या शैक्षणिक वाटचालीत आजी-आजोबांचे प्रेम, संस्कार आणि अनुभव यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमात आजी-आजोबांचे पद्यपूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी आजी-आजोबांनी आपल्या जीवनातील विविध अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव व्यक्त करत आजी-आजोबांशी असलेले प्रेमाचे नाते उलगडले. जुन्या पिढीचे अनुभव आणि नव्या पिढीचे विचार यांचा सुंदर संगम या मेळाव्यात पाहायला मिळाला.
शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संस्कार, आपुलकी आणि सामाजिक सहभाग यांचे केंद्र आहे, याची प्रचिती या कार्यक्रमातून आली. शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी दाखविलेली एकजूट निश्चितच प्रेरणादायी ठरली. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देतानाच त्यांच्यामध्ये ज्येष्ठांविषयी आदर, कृतज्ञता आणि कौटुंबिक मूल्ये रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
सरस्वती पूजन, प्यूरिफायर-कुलर उद्घाटन आणि आजी-आजोबा स्नेहमेळावा अशा विविध उपक्रमांमुळे तळेबाजार शाळेतील हा दिवस आनंददायी, संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








