LIVE UPDATES

गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ऐनारी ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 08:13 PM
views 137  views

वैभववाडी : ऐनारी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमित कारभाराच्या चौकशीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास स्थगित केले. ग्रामपंचायतीचे संपूर्ण दप्तर सील करून पंचायत समितीत आणण्यात येईल. चार विस्तार अधिकाऱ्यांमार्फत दप्तराची तपासणी केली जाईल. तपासणीत त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ यांनी दिले. सभापती सिद्धेश रावराणे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

 ऐनारी ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असून कारभारात अनियमितता असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी चौकशीची मागणी करूनही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी करीत आज पंचायत समिती कार्यालयासमोर सकाळपासून उपोषण सुरू केले.भर उन्हात किरण विचारे, श्रीकृष्ण साईल, अमोल पांचाळ, किमया विचारे, मयुरी साहिल यांच्यासह ग्रामस्थ उपोषणाला बसले होते.

अखेर दुपारी गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी माने आणि विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी किरण विचारे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली. ग्रामपंचायतीचे दप्तर तातडीने ताब्यात घेऊन ते पंचायत समितीत आणावे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीचे संपूर्ण दप्तर सील करून पंचायत समितीत आणण्याचे मान्य करण्यात आले. सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी चार विस्तार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दप्तराची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत आर्थिक व्यवहारांसह अन्य बाबींमध्ये तफावत आढळल्यास संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे वाघ यांनी स्पष्ट केले.

  दरम्यान, सभापती सिद्धेश रावराणे यांनीही दूरध्वनीद्वारे उपोषणकर्त्या ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनांनंतर ग्रामस्थांनी दुपारी साडेतीन वाजता उपोषण स्थगित केले.

या उपोषणाला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.यावेळी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, जनार्दन विचारे, चंद्रकांत विचारे,  सरचिटणीस गुलजार काझी, स्वप्निल रावराणे, काँग्रेसचे शांताराम नेवरेकर,  अॅड. अजितसिंह काळे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.