LIVE UPDATES

​‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ संदेश देत ‘नॅशनल मोटारसायकल रॅली’ कुडाळात

सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून जंगी स्वागत
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 10:56 AM
views 19  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

​कुडाळ :लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरात आयोजित राष्ट्रीय एकता परेडच्या पार्श्वभूमीवर ‘नॅशनल मोटारसायकल रॅली-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे आज महाराष्ट्रात आगमन झाले असून, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

​‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ (अमली पदार्थांविरोधात लढा) हा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश घेऊन निघालेली ही रॅली बुधवारी सकाळी कुडाळ येथे दाखल झाली. येथील कुडाळ हायस्कूल प्रांगणात उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे आणि पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या हस्ते रॅलीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

​राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावणे आणि युवा पिढीमध्ये अमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. या रॅलीमध्ये गोवा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीप येथील पोलीस दलांतील तब्बल ४६ मोटारसायकलस्वार सहभागी झाले आहेत. गोव्यातून प्रवास करत या रॅलीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला आणि तेथून ती कुडाळ शहरात पोहोचली.

​कुडाळ हायस्कूल येथे पार पडलेल्या स्वागत सोहळ्याप्रसंगी विविध पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, कुडाळ हायस्कूल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, नागरिक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आणि घोषणा देत रॅलीतील पोलिसांचे मनोबल वाढवले.

​कुडाळमधील भव्य स्वागतानंतर आणि जनजागृतीपर कार्यक्रमानंतर ही मोटारसायकल रॅली पुढील प्रवासासाठी कणकवलीच्या दिशेने रवाना झाली.