
सावंतवाडी : यंदाच्या हंगामामध्ये सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने शासकीय आधारभूत किंमतीत ९९७ शेतकऱ्यांकडून सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील ९ केंद्राच्या माध्यमातून भात खरेदी करण्यात आली असून त्यापोटी शेतकऱ्यांना ३ कोटी २० लाख ७ हजार २४६ रूपये प्राप्त झाले असल्याची माहिती चेअरमन प्रमोद गावडे यांनी दिली.
शासकिय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२३-२४ अंतर्गत सावंतवाडी तालुका सह. खरेदी-विक्री संघाने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात ९ केंद्रामार्फत १०२२ शेतक-यांची नोंदणी केली होती. त्यापैकी ९९७ शेतक-यांकडील १४६६२ क्विंटल भाताची खरेदी केली असून, तालुक्यातील ९९७ शेतक-यांनी ३ कोटी २० लाख ०७ हजार १४६ रूपये भात विक्री रक्कमेचा लाभ घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील १०२२ शेतक-यांनी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये ई-पीक ची नोंद करुन भात खरेदीची नोंदणी केली होती. शासनाने प्रती हेक्टर २० हजार प्रमाणे दोन हेक्टर पर्यतच्या नोंदणीला प्रोत्साहनपर बोनस जाहीर केला होता. त्याप्रमाणे १०२२ शेतक-यांना रक्कम १ कोटी ४५ लाख ४९ हजार ६० रूपये शेतक-यांच्या सेव्हिंग खाती शासनाने बोनस रक्कम वर्ग केली आहे, अशी माहिती खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री. प्रमोद गावडे यांनी दिली आहे.
गावडे म्हणाले,शासकीय आधारभूत किंमतीत भात खरेदी करण्यासाठी ई पीक नोंदणी आवश्यक आहे. यंदा भात विक्री करण्यासाठी शेतकरी आले होते,पण त्यांनी ई पीक नोंदणी केली नव्हती त्यामुळे ते शासकीय हमीभाव किंमतीत भात विक्री पासून वंचित राहीले आहेत त्यामुळे यंदाच्या हंगामात ई पीक नोंदणी प्रत्येक शेतकऱ्याने केली पाहिजे. इ पीक नोंदणी केली तर शासनाने भात नुकसान भरपाईचा निर्णय घेतला तर शेतकरी वंचित राहणार नाहीत. शासकीय ई पीक नोंदणी आणि खरेदी विक्री संघाकडे नोंदणी महत्त्वाची आहे. त्याची भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंद घेऊन पावसाळ्यात ई पीक नोंदणी सक्तीने करावी.
यंदाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना भात बियाणे,खत, किटकनाशके खरेदी विक्री संघाने उपलब्ध करून दिली आहेत. खरेदी विक्री संघाने स्वतः सह मागणी केलेल्या विकास संस्था, ग्रामपंचायत आणि कृषी केंद्रांना खत उपलब्ध करून दिले आहे असे प्रमोद गावडे म्हणाले.