सावंतवाडी बस स्थानकाची पुणे प्रादेशिक व्यवस्थापकांकडून पाहणी

Edited by: विनायक गांवस
Published on: August 06, 2025 18:01 PM
views 126  views

सावंतवाडी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत सावंतवाडी येथील एसटी बस स्थानकाची आज पुणे येथील एका समितीने पाहणी केली. एसटी महामंडळाच्या पुणे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती अमृता ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने बस स्थानकातील विविध व्यवस्थापनाची तपासणी केली.

या पाहणीसाठी आलेल्या समितीमध्ये पुणे येथील एसटी महामंडळाचे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी दादासो गावडे, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे आणि प्रवासी योगेश टोपले यांचा समावेश होता. या भेटीदरम्यान विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख आणि विभागीय लेखा अधिकारी सुवर्णा दळवी उपस्थित होते. सावंतवाडी आगार व्यवस्थापक निलेश गावित आणि स्थानक प्रमुख राजाराम राऊळ यांनी समितीचे स्वागत केले.

या अभियानांतर्गत राज्यातील एसटी बस स्थानकांची स्वच्छता, साफसफाई, स्वच्छतागृहे आणि कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेची पाहणी करून त्यांना गुणांकन दिले जाते. त्यानुसार, सावंतवाडी आगाराच्या विविध व्यवस्थापनाचे निरीक्षण करून गुणांकन करण्यात आले. हे अभियान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राबवले जात आहे.