प्रा. डॉ. लीना जावकर यांच्या ‘कम्युनिकेशन स्किल्स’चे प्रकाशन

सह्याद्री पॉलिटेक्निकमध्ये उत्साहात पडला पार
Edited by: मनोज पवार
Published on: July 26, 2025 14:39 PM
views 63  views

सावर्डे  : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री पॉलिटेक्निकमध्ये कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. लीना जितेंद्र जावकर लिखित कम्युनिकेशन स्किल्स या अभ्यासक्रमाधारित पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. निराली प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पॉलिटेक्निकचे प्राचार्य मंगेश भोसले व लेखक-पत्रकार तसेच निराली प्रकाशनचे मार्केटिंग असोसिएट धीरज वाटेकर यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपप्राचार्य उदयसिंग लांडगे, जनरल सायन्स विभागप्रमुख प्रा. कुसुमडे, मेकॅनिकल विभागप्रमुख खानविलकर, इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख कबाडे, ऑटोमोबाईल विभागप्रमुख साळुंखे, सिव्हिल विभागप्रमुख पेटकर, आयटी विभागप्रमुख ओकटे आणि कॉम्पुटर विभागप्रमुख सुषमा बने आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. जावकर यांनी, अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत दुसरे पुस्तक प्रकाशित झाल्याचे समाधान व्यक्त करत निराली प्रकाशन, सह्याद्री संस्था आणि विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या निराली प्रकाशनकडून सलग दोन पुस्तके प्रकाशित होणे ही सन्मानाची बाब आहे,” असे त्या म्हणाल्या. प्रकाशन प्रक्रियेत प्राचार्य भोसले, निराली प्रकाशनचे मॅनेजिंग डायरेक्टर जिग्नेश फुरिया आणि कोकण-गोवा प्रतिनिधी धीरज वाटेकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान देत शिक्षणाच्या जोडीने सामाजिक भान, आभासी जगाचे वास्तव आणि वैयक्तिक प्रगतीसाठी आत्ममूल्यमापनाची गरज अधोरेखित केली. त्यांनी डॉ. जावकर यांच्या लेखनशैलीचे कौतुक करत, केवळ गुणवत्तेमुळे चार महिन्यांत दोन पुस्तके प्रकाशित होणे ही उल्लेखनीय बाब असल्याचे सांगितले. यावेळी निराली प्रकाशनचे जिग्नेश फुरिया यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवण्यात आला.

प्राचार्य मंगेश भोसले यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा शैक्षणिक उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. यावेळी ‘कम्युनिकेशन स्किल्स’ पुस्तकासाठी तांत्रिक सहाय्य करणारा विद्यार्थी साहिश जोशी आणि विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी बोरोले आणि प्रा. दिपाली पांचाळ यांनी केले, तर प्रा. मदन कुंभार यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन टेक्निकल टीमच्या विद्यार्थ्यांनी नेटकेपणाने पार पाडले. या प्रकाशन सोहळ्यास सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक आणि प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.