भावार्थ मांद्रेकरांच्या 'खंबीर सरनौबत हंबीरराव' पुस्तकाचे प्रकाशन !

Edited by: विनायक गावस
Published on: October 26, 2023 16:31 PM
views 61  views

सावंतवाडी : कोणतेही युद्ध एकटा राजा कधीही लढू शकत नाही, आणि आपले राज्य तो एकटा कधीच चालवू शकत नाही. प्रत्येक राजाला सोबत असते ती त्याच्या साथीदार, शिलेदारांची अर्थात मावळ्यांची.! प्रामाणिक, पराक्रमी, धाडसी, शूर मावळे सोबत असल्यास कोणतही युद्ध जिंकणे अशक्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असेच निष्ठावान सोबती होते, म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊ शकली. महाराजांच्या मराठा स्वराज्याचे सरनौबत हंबीरराव मोहिते हे महापराक्रमी, कर्तबगार व कुशल संघटक होते. त्यांचे चरित्र व स्वराज्य निष्ठा ही पुस्तक रूपातून लेखक भावार्थ मांद्रेकर यांनी आपल्या उत्कृष्ट लेखणीतून जगासमोर आणली आहे. त्यांचे 'खंबीर सरनौबत हंबीरराव' हे पुस्तक पुढील पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल आणि नवा इतिहास घडवेल, असे गौरवोद्गार शिव-शंभूव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी येथे काढले.

पेडणे येथील श्री भगवती हायस्कूलच्या सभागृहात लेखक भावार्थ मांद्रेकर यांच्या 'खंबीर सरनौबत हंबीरराव' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रा. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून लोकायत प्रकाशन, साताराचे राकेश साळुंखे, उद्योजक नारायण सोपटे केरकर, पेडणेच्या श्री भगवती हायस्कूलचे चेअरमन प्रवीण कोटकर, सुरभी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सांगळे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकायत प्रकाशन सातारा, मैत्रेय पेडणे, सुरभी पेडणे, स्वामी विवेकानंद संस्था -मोपा आणि शिवराज्य प्रतिष्ठान, केरी यांच्या संयुक्त विद्यमाने पेडणेच्या श्री भगवती हायस्कूलच्या सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रा. रूपेश पाटील पुढे म्हणाले की, भावार्थ मांद्रेकर यांच्या रूपाने गोव्याला एक अभ्यासू, चांगला लेखक, कादंबरीकार मिळाला आहे. हे पुस्तक दर्जेदार असून आपण स्वराज्याच्या मावळ्यांची पुस्तके लिहून त्यांची मालिकाच प्रकाशित करावी. महाराष्ट्र राज्यातील एक हजार ग्रंथालयात हे पुस्तक देण्याची जबाबदारी ही माझी राहील. हंबीरराव हे खंबीर होते. त्यांनी अनेक वादळे झेलली. त्यामुळे वैचारिक खंबीरता या कादंबरीत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या लेखणीतून वाचकांना शिवा काशीद यांचे चरित्र्य देखील वाचायला मिळावे, ही अपेक्षा व्यक्त करतो.

प्रारंभी प्रास्ताविक सादर करताना लोकायतचे प्रकाशक राकेश साळुंखे म्हणाले लेखक भावार्थ मांजरेकर यांनी चिकाटीतून अभ्यासपूर्ण निर्माण केलेली कलाकृती म्हणजे 'खंबीर सरनोबत हंबीरराव' हे पुस्तक आहे. लोकायतला हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी दिल्याबद्दल आपण लेखकांचे अभिनंदन करून आभार मानतो.

लेखक भावार्थ मांद्रेकर म्हणाले की, गोव्यातील एका दैनिकासाठी 'मर्द मराठा' या सदराखाली २० लेख लिहिले होते. त्यातूनच पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. स्वराज्याचे सरलष्कर हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. यासाठी खूप अभ्यास व मेहनत घेतली. मर्द मावळ्यांचा इतिहास हा सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा हाच माझा यातून प्रामाणिक प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नौदलाचे पहिले प्रमुख मायनाक भंडारी यांच्या जीवनावर आधारित दुसरे पुस्तक लिहिण्याचे काम सुरु असून लवकरच ते देखील वाचकांच्या भेटीला येईल. त्यांच्याविषयी मर्यादित माहिती उपलब्ध आहे.

यावेळी बांदा येथील युवा पत्रकार निलेश मोरजकर, युवा उद्योजक संकेत वेंगुर्लेकर, शिक्षक हंसराज गवळे, तसेच नितीन मावळणकर, राजाराम मावळणकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि गोवा राज्यातील साहित्य, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी मान्यवर उपस्थित होते. अतिथी मान्यवरांचा परिचय प्रास्ताविक पत्रकार उमेश गाड यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवसो परब यांनी केले तर चेतन कुबल यांनी उपस्थितांचे आभार मानले.