कवी सफरअली इसफ यांच्या अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहाचे प्रकाशन !

प्रा.वंदना पलसाने, कवी अजय कांडर यांच्या हस्ते प्रकाशन !
Edited by: संदीप देसाई
Published on: April 17, 2024 05:44 AM
views 90  views

कणकवली :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कवी सफरअली इसफ यांच्या दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'अल्लाह ईश्वर' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार २० एप्रिल रोजी सायं.६ वा. पुणे साने गुरुजी स्मारक नाथ पै सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसेवा दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ अभ्यासिका प्रा.वंदना पलसाने, कवी अजय कांडर यांच्या हस्ते 'अल्लाह ईश्वर ' काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

       सदर कार्यक्रम दोन विभागात आयोजित करण्यात आला असून पहिल्या विभागात अभिनेत्री मुक्ता कदम, अभिनेता कृतार्थ शेवगावकर आणि नामवंत कवयित्री अंजली ढमाळ ही कलावंत मंडळी सफरअली इसफ यांच्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत. अल्लाह ईश्वर मधील कविता आजच्या वास्तवाला धरून कोणत्या भावार्थाने लिहिल्या गेल्या आहेत हे उपस्थित प्रेक्षकांना कळावे या हेतूने हा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानंतर दुसऱ्या सत्रात प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी प्रा वंदना पलसाने आणि कवी अजय कांडर यांच्या हस्ते अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.यावेळी प्रा.पलसाने, कवी कांडर अल्लाह ईश्वर मधील कवितांवर विस्ताराने भाष्य करणार आहेत. कवी सफरअली इसफ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत कवी असून वैभववाडी तिथवली सारख्या आडवळणाच्या गावात राहून ते सुमारे 35 वर्ष निष्ठेने कविता लिहीत आहेत. आता दर्या प्रकाशन सारख्या प्रतिष्ठित प्रकाशनाने त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला असून या संग्रहाला ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखडे (नागपूर) यांची अभ्यासपूर्ण अशी दीर्घ प्रस्तावना लाभली आहे.

या प्रस्तावने मध्ये श्री वानखडे म्हणतात कवी सफरअली यांची 'अल्लाह ईश्वर ' काव्यसंग्रहातील कविता खऱ्या अर्थाने आताची, आजची कविता आहे.अखंड मानवतेच गीत गाणारी ही कविता वाचल्यावर वाचकाला आतून ती ढवळून काढते व वाचकाच्या डोळ्यात अंजन घालते.हे या कवितेचे सर्वात मोठे यश आहे.कवीने वेदना भोगली, अन्याय अत्याचाराला तो सामोरा गेला, दु:ख, दारिद्रयाचे त्याने चटके सोसले, पदोपदी देशभक्ती सिध्द करण्याच्या यातना सहन केल्या हे आजच अल्पसंख्याक वर्गाचं भयावह चित्र तो आपल्या कवितेतून मांडतो. तरीही त्याचा चांगुलपणावरचा विश्वास अबाधित आहे. घृणा, तिरस्कार, उपेक्षा, राग, द्वेषच त्याच्या वाट्याला आला असतांनादेखील त्याने प्रेमाची कास सोडली नाही. निराश होत नाही उलट पुरेपूर आशावादाने लबालब कवी म्हणतो, " पण कधीतरी परिवर्तनासाठी एकत्र येवूच आम्ही कधी तरी धर्मांधतेच्या भिंती पाडूच आम्ही."हा दुर्दम्य आशावाद हे या कविता संग्रहाचे व खुद्द कवीचे बलस्थान आहे.तरी या प्रकाशन सोहळ्यात काव्य रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रसेवा दलातर्फे करण्यात आले आहे.