शेतकरी संघ देवगडच्या दिवाळी अंकाच प्रकाशन

Edited by:
Published on: November 17, 2023 19:56 PM
views 89  views

देवगड : देवगडचे अर्थकारण हे आंबा व मत्स्य व्यवसायावरती अवलंबून आहे बदलत्या वातावरणामध्ये आंबा पिक टिकविणे हि आता बागायतदारांसमोर एक कसोटिच निर्माण झाली आहे. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानानुसार बदलत्या वातावरणामध्ये आंबा पिक टिकविणे महत्वाचे आहे. कृषी विभागाचा नाकर्तेपणा आज देवगड तालुक्यामध्ये आंबा बागायतदारांच्या मुळाशी येवून ठेपला आहे. मात्र आंबा व इत्तर फळबागायत शेतकरी संघ देवगड शेतक-यांचे हित जोपासत असल्यामुळे अश्या संघटनेच्या पाठीशी शेतकरी व बागायतदारांनी उभे राहून त्यांना पाठबळ देणे महत्वाचे असल्याचे मत आंबा व इत्तर फळ बागायती शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास रुमडे यांनी व्यक्त केले. 

देवगड येथील शिक्षक भवन सभागृहामध्ये आंबा व इत्तर फळबागायती शेतकरी संघ देवगड यांच्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपिठावरती देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर,रामदास अनभवणे,संकेत लब्धे,चंद्रकांत गोईम,शुभम चौघुले,उल्हास मणचेकर,निलेश पेडणेकर,शिवाजी साटम,सागर जांभळे,रुपेश सोमले,अनंत गोडे,हरिशचंद्र गोडे,धनंजय गोडे,प्रसाद परब आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना रुमडे म्हणाले की, दिवाळी अंकाच्या माध्यमातून शाश्वत शेती व फळबागायती कश्या पध्दतीने करुन शेतक-यांनी उन्नती साधली पाहिजे याचे अनेक लेख मार्गदर्शनपर लिहिण्यात आले आहेत. शेतक-यांनी आत्मनिर्भय बनण्याच्या दृष्टीकोनातून वाटचाल केली पाहिजे. कालची शेती म्हणजे हरितक्रांतीच्या पुर्वीची आणि आजची शेती म्हणजे हरित क्रांतीच्या लाटेवरती स्वार झालेली आहे. देवगड तालुक्यातील शेतकरी हे आंबा व फळबागायतींवरती आपली चांगली उन्नती साधत आहे. हि एक महत्वाची बाब आहे पण बदलत्या वातावरणामध्ये आंबा पिक टिकविणे हे एक मोठे संकट बागातदारांसमोर आहे. अश्या परिस्थितीमध्ये बागायतदारांनी हताश न होता प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जावून कृषी सल्यानुसार परिस्थितीवरती मात करुन आंबा पिक टिकविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले पाहिजे असल्याचे त्यांनी सांगितले.