उघाडे धनगरवाडीतील सार्वजनिक विहीर कोसळली

Edited by: लवू परब
Published on: August 24, 2025 13:04 PM
views 171  views

दोडामार्ग : गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील  उघाडे धनगरवाडी येथील सार्वजनिक चिरेबंदी विहीर कोसळली आहे, त्यामुळे तेथील नागरिकांचे चतुर्थीच्या  सणाच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल होत आहेत. 

गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीला कळवले असूनही त्यावर कोणती कारवाई झालेले नाही. त्यामुळे चतुर्थी सणाला  पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्या कोसळलेल्या विहिरीचा पंचनामाही अजून झालेला नाही. या विहिरीच्या पाण्यावर उघाडे धनगरवाडी येथील सात घरे अवलंबून आहेत. तरी प्रशासनाने यावर उपाययोजना  करावी अशी विनंती तेथील नागरीक करीत आहेत.