
कुडाळ : मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेले एक महिना अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला तसेच आरक्षणाच्या मागणीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मराठा समाज बांधवांचा पाठिंबा दर्शविण्यासाठी हि आजची जनसंपर्क यात्रा आहे. असे अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अॅड. सुहास सावंत सांगितले.
शनिवारी सावंतवाडी मतदार संघात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तर रविवारी कुडाळ मतदार संघातील जनसंपर्क यात्रेला कुडाळ येथील मराठा समाज हाॅल येथून या यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर येथील राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मराठा महासंघाने यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना ऍड सुहास सावंत म्हणाले की, मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच समाजाच्या अन्य प्रश्नांबाबत अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सिंधुदुर्ग मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघात काढण्यात आलेल्या मराठा जनसंपर्क यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अॅड.सुहास सावंत, शैलेश घोगळे, आशिष काष्टे, अनुपसेन सावंत, सचिन सावंत, शुभम राणे, दिनेश म्हाडगुत, सुनील सावंत, आनंद भोगले, अनिल नाईक, सौ.रेवती राणे, सौ.अक्षता राणे, वैभव जाधव, हर्षद पालव आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर बाजारपेठ मार्गे पिंगुळी - माणगांव - वाडोस - हिर्लोक - ओरोस - कट्टा दिशेने कार रॅली मार्गस्थ झाली.