
सावंतवाडी : आजपर्यंत जगातील प्रत्येक देशाचा इतिहास अभ्यासला तर लक्षात येते की, जी अलौकिक क्रांती भारतीय युवकांनी केली आहे, अशी क्रांती इतर देशातील लोकांनी केलेली दिसत नाही. म्हणून जगाला प्रेरणा आणि क्रांतीचा धगधगता इतिहास देण्याची किमया भारतीय युवकांमध्ये आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी केले. सावंतवाडी येथे 'मेरा युवा भारत सिंधुदुर्ग' व 'पब्लिक रिलेशन फाऊंडेशन सिंधुदुर्ग' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 'उत्सव विचारांचा' या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. पाटील बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक गजानन नाटेकर, शिवसेना ओबीसी तालुकाध्यक्ष वासुदेव होडावडेकर, निवडणूक नायब तहसीलदार सविता तारी, सावली फाऊंडेशनच्या अध्यक्ष सावली पाटकर, मेरा युवा भारत सिंधुदुर्ग साथी जयराम जाधव, पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या सचिव फिजा मकानदार, उर्मिला गावडे, अनुभव शिक्षा केंद्राचे साथी सहदेव पाटकर, सावली फाउंडेशनचे प्राध्यापक सचिन पाटकर, मल्लसम्राट प्रतिष्ठानचे सचिव ललित हरमलकर, परीक्षक समील नाईक, नारायण परब, अल्ताफ मुल्ला, पत्रकार साबाजी परब आदी उपस्थित होते.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत 'मेरा युवा भारत सिंधुदुर्ग' व 'पब्लिक रिलेशन फाऊंडेशन सिंधुदुर्ग' यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिरात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 'उत्सव विचारांचा' मोठ्या दिमाखात संपन्न झाली. यावेळी विचार मांडताना प्रा. रुपेश पाटील यांनी पुढे सांगितले की, पब्लिक रिलेशन फाऊंडेशन सिंधुदुर्ग सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून विशेषतः युवकांच्या कल्याणासाठी व त्यांना योग्य दिशा प्राप्त करून देण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात, याचा विशेष आनंद होतो, असे सांगत त्यांनी युवकांचे कार्य आणि जबाबदार्या काय ? हे स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित निवडणूक नायब तहसीलदार सविता तारी, प्रा. सचिन पाटकर यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना फाऊंडेशनच्या सचिव फिजा मकानदार यांनी सांगितले की, निसर्ग संपन्न आपल्या कोकणात गरज आहे ती युवकांना दिशा देण्याची. येथील युवक दिवसेंदिवस स्थलांतरित होत आहे. जर येथील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण केले गेले तर फार मोठा बदल होऊ शकतो, असा आशावाद व्यक्त करून त्यांनी स्पर्धेचा हेतू विशद केला. या स्पर्धेत सिद्धी शशिकांत सावंत प्रथम, तर मंदार दुर्गाराम जोशी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. विठ्ठल संजय दळवी यांचा यांनी तृतीय क्रमांक मिळवत बाजी मारली. तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक प्राची गोविंद सावंत व द्वितीय वीणा वामन गावडे यांनी पटकावला. स्पर्धेचे परीक्षण समील नाईक व नारायण परब यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पब्लिक रिलेशन फाऊंडेशनचे नासिर मकानदार, श्रुती सावंत, कामाक्षी महालकर, फातिमा मकानदार, ललित हरमलकर, मिताली राऊळ, राकेश जाधव, भाविका कदम, दिपाली राऊळ, प्राजक्ता सांगेलकर, विनायक सांगेलकर, तेजस धोंड यांनी प्रयत्न केले. स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक विजेत्या सिद्धी सावंत यांनी फाऊंडेशनचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून दरवर्षी असे उपक्रम राबवावेट, अशी अपेक्षा व्यक्त करत फाऊंडेशनचे आभार मानले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कामाक्षी महालकर यांनी केले तर आभार श्रूती सावंत हिने मानले.
या स्पर्धेसाठी 'आजच्या युवकांसमोर आव्हाने', 'आजच्या भारतात स्त्री खरंच सुरक्षित आहे का?', 'येवा कोकण आपलोच असा पण तो कोकण टिकवण्यासाठी आमची जबाबदारी काय?', 'कधी मिळेल का कोकणातल्या तरुणाला त्याच्याच हक्काच्या कोकणात कोकणातल्या मातीत रोजगार?' असे ज्वलंत विषयांवर ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत अंकिता पाटील, दिपाली राऊळ, प्रणिता गवळी, वीणा गावडे, प्राची सावंत, विठ्ठल दळवी, भाविका कदम, वैभवी हानपोड, मंदार जोशी, सिद्धी सावंत, साथिया भाउद्दीन, सुनिधी मराठे, ज्ञानेश्वर गवळी आदींनी बहारदार वक्तृत्व सादर करून परीक्षकांसह श्रोत्यांची मने जिंकली.