
सावंतवाडी : मानसिक गुलामगिरीत आपणाला आणून सोडलं आहे. तिथून जर आपला कडेलोट झाला तर अवघड होईल, आम्ही आलोत अन् जाणारच नाही ही परिस्थिती फक्त भारतात नाही. आपल्या सारखाच लोचा अमेरिकेतही झाला आहे. म्हणूनच तिथे ट्रम्प सारखा माणूस निवडून येतो. युरोपमध्येही उजव्या शक्ती कार्यरत आहेत. आपले प्रशिक्षित कार्यकर्तेच ही कोंडी फोडू शकतात असे मत ख्यातनाम कवी, विद्रोही साहित्य संमेलन सातारा अध्यक्ष संभाजी भगत यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे त्यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
सत्यशोधक समता प्रतिष्ठान आणि जनवादी सांस्कृतिक चळवळ यांच्या माध्यमातून शाहीर संभाजी भगत यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन येथील कवी केशवसुत कट्टयावर करण्यात आले होते. जेष्ठ लेखक, कवी कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जनवादी सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र कॉ. संपत देसाई, सत्यशोधक समता प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग अध्यक्ष कॉ. स्वाती तेली आदी उपस्थित होते. यावेळी शाहीर श्री. भगत म्हणाले, आजची परिस्थिती वाईट असून जुनी उत्तर त्याला लागू पडणारी नाही. त्याला नव्या उत्तरांची गरज आहे. यासाठी मूळ तत्वज्ञान शोधून त्याचा विकास करावा लागेल असंही ते म्हणाले.
तसेच मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाहीर असून त्यांच्यामुळे मला जग कळलं आहे. आज समाजातील या अंधारातून बाहेर पडण्यासाठी चिंतनाची गरज आहे. आजची परिस्थिती ज्या स्तराला जातेय ते पाहून जीवाचा थरकाप होईल अशा घटना आजूबाजूला घडत आहेत. हे जग ज्या परिस्थितीत येऊन थांबले आहे याचे वर्णन अनेक साहित्यिकांनी केलं आहे. हे संकट तत्वज्ञानाचे असून मनुष्यासमोर जगावं की मरावं ? असा प्रश्न पडला आहे. रोज कुठे ना कुठे युद्ध सुरू आहे. भय, असुरक्षिततेच्या वातावरणात मानव जगत आहे. यातू़न जागृती करताना भुतकाळात महापुरुषांनी हौतात्म्य देखील पत्करल होत असही त्यांनी सांगितले. दरम्यान, मेंदू पायाशी गहाण टाकून आपण काम करत असल्यासारखी परिस्थिती आहे. वैचारिक दृष्ट्या आपण कुठेतरी बधीर होत चाललो आहोत. आजच्या वर्तमानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी प्रयत्न होत आहे. आपला मेंदू हायजॅक करण्याच काम होत आहे. मात्र, संभाजी भगत यांसारखी माणस या परिस्थितीतून आपणाला जागृत करण्याच काम करत आहेत असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले.











