पं. स. च्या नवीन इमारतीसाठी सेना - भाजपात उफाळला श्रेयवाद..?

Edited by: विनायक गावस
Published on: October 10, 2023 20:11 PM
views 185  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी शासनाने १४ कोटी ५० लाख रूपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. गेली अनेक वर्षे रेंगाळलेला हा प्रश्न अखेर शिंदे, फडणवीस व अजित पवारांच्या महायुती सरकारमध्ये मार्गी लागत आहे. यानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपात श्रेयवादाची लढाई सुरू झालेली पहायला मिळत आहे.

पंचायत समितीची सालईवाडा येथील इमारत जीर्ण झाल्याने नवीन प्रशस्त इमारत व्हावी असा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या कार्यकाळात ह्यासाठी निधीही मंजूर झाला होता. इमारतीसाठी २ कोटी १५ लाख रुपये मंजुरीही प्राप्त झाली होती. मात्र, नंतरच्या काळात कागदावरील स्वप्न प्रत्यक्षात उतरलं नाही. त्यातच सालईवाडा येथील इमारत देखील  जीर्ण व धोकादायक झाल्याने ४ वर्षांपूर्वी शिरोडा नाका येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या जागेत पंचायत समिती स्थलांतरीत करण्यात आली. बांधकाम विभागाच्या गोदामात ही व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या १४ कोटी ५० लाखाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पंचायत समितीचा प्रश्न अखेर निकाली लागला आहे.

यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सहकार्य केले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री  दीपक केसरकर यांनी दिली. याआधी इमारतीसाठी दोन कोटी रुपये मंजूर होते. मात्र तो प्रस्ताव रद्द करून सुसज्ज चांगली अशी नवीन इमारत व्हावी म्हणून शहरातील शिरोडा नाका परिसरात सध्या असणाऱ्या पंचायत समितीच्या २७ गुंठे जागेमध्ये १४ कोटी ५० लाख रुपयांच्या नवीन प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. दरम्यान सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तालुक्यातील नवीन पंचायत समितीच्या इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या स्वतःच मालकीच्या जमीन व इमारती बनल्या असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. लवकरच सावंतवाडी तालुका पंचायत समितीचा या कामाला सुरुवात होईल अशी ग्वाही दीपक केसरकर यांनी दिली.

दरम्यान, गेली अनेक वर्षे सावंतवाडी पंचायत समिती च्या नुतन इमारतीचा प्रश्न रेंगाळला होता.या प्रश्नाला अखेर सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण याच्या माध्यमातून मार्गी लागल्याची माहिती भाजप सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली. सावंतवाडी पंचायत समितीचा प्रश्न गेली अनेक वर्षे रेंगाळला होता.इमारत बांधकामासाठी पुरेसी जागा उपलब्ध होत नव्हती त्यातच जुन्या इमारतीच्या ठिकाणी नवीन इमारत बांधणे सोयीस्कर नसल्याने अखेर सध्याच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागांच्या जागेत इमारत बांधण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. तर पंचायत समितीची नुतन इमारत उभी राहावी यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात येत होता.अखेर त्यांच्याच पुढाकारातून हे काम मार्गी लागल्याचे सारंग यांनी सांगितले. तसेच इमारत व्हावी म्हणून माझ्यासोबतच माजी उपसभापती शितल राऊळ व माजी जि. प . सदस्या रेश्मा सावंत ,माजी सभापती रवींद्र मडगावकर, मानसी धुरी, माजी सभापती प्रमोद सावंत यांनीही विशेष पाठपुरावा केला होता असेही ते म्हणाले.