शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी एमबीबीएस एमडी डॉक्टर द्या अन्यथा आंदोलन

Edited by: दिपेश परब
Published on: July 31, 2023 19:55 PM
views 110  views

वेंगुर्ले : शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. उपचारासाठी रुग्णांना गोवा-बांबुळी येथे हलवावे लागत आहे. त्यामुळे ही गंभीर समस्या लक्षात घेता येत्या दहा दिवसात येथे डॉक्टर्स उपलब्ध न झाल्यास युवक काँग्रेस तर्फे येत्या १५ ऑगस्टला ग्रामस्थांसहित शिरोडा उपजिल्हा रुग्णालया समोर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यात येईल आणि त्याला पूर्णत्व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सिद्धेश परब यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

    शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात एकही पर्मनंट डॉक्टर नाही. या रुग्णालयात ७ पदे मंजूर असून त्यातील ५ पदे कार्यरत आहेत. त्यात ४ कंत्राटी व १ बंधपत्रिका ज्यामध्ये एकही डॉक्टर एमबीबीएस एमडी (एम बी बी एस एमडी) नाही. या भागाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वेंगुर्ले तालुक्यावर लक्ष नसल्याने ही परिस्थिती असल्याचा आरोपही यावेळी सिद्धेश परब यांनी केला आहे.

  या निवेदनात म्हटले आहे की,  जिल्ह्यात आज जिल्हा रुग्णालय नंतर एकूण चार उपजिल्हा रुग्णालय असून त्यातील एक शिरोडा उपजिल्हा रुग्णालय ज्यात दशक्रोशीतील ग्रामस्थ उपचारासाठी येतात. मात्र हॉस्पिटलची अवस्था आज दयनीय झाली आहे. ना चांगले डॉक्टर, ना चांगली सुसज्ज असलेली उपकरणे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्या ऐवजी त्यांच्या जीवाशी खेळले जात आहे. नाईलाजाने मग रुग्णांना गोवा बांबोळी येथे किंवा अन्य ठिकाणी न्यावे लागते, त्यात रुग्ण दगवतात. या अगोदर प्रशासनाला व आरोग्य विभागाला जाग येण्यासाठी अनेक वेळा विनंती केली आहे. तसेच अनेक वेळा याबाबत आंदोलन देखील केली गेली. तरीही याकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र आता लवकरात लवकर येथे कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत. ज्यामध्ये एमबीबीएस एमडी डॉक्टर, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ व स्पेशलिस्ट डॉक्टर असतील. जर आमची मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करावेच लागेल असे या निवेदनात म्हटले आहे. 

    निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांना आज युवक काँग्रेसच्या वतीने सिद्धेश परब यांनी दिले. यावेळी शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी, आरवली माजी उपसरपंच मयूर आरोलकर, काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष आनंद मसुरकर, वैभव मांजरेकर आदी उपस्थित होते.