पर्यटकाला सोयी सुविधा द्या : पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Edited by:
Published on: September 27, 2024 14:09 PM
views 129  views

सिंधुदुर्गनगरी : आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटन वाढीबरोबरच रोजगार निर्मितीही महत्वाची आहे.  प्रत्येक तालुक्यात एक असे ठिकाण विकसित करा की जे पर्यटकांना आकर्षित करेल. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकाला सोयी सुविधा द्याव्यात असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले. जागतिक पर्यटन दिनानिमित्त प्रादेशिक पर्यटन कार्यालयामध्ये पर्यटन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री रविंद्र चव्हाण, तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, प्रादेशिक अधिकारी दीपक माने आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्याचे खासदार नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख मिळाली. पर्यटन वाढविण्यासाठी पर्यटकाला सोयी सुविधा देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात येऊन पर्यटकाला आनंद मिळाला पाहिजे. यावर्षी पर्यटन दिनाची थीम 'पर्यटन आणि शांतता' अशी ठेवण्यात आली आहे. रोजगार निर्मिती वाढवणे हा या थीमचा उद्देश आहे. ॲटो रिक्षा चालकांनी पर्यटकाला जिल्ह्यातील चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. जेणेकरुन आपल्या जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होईल असेही ते म्हणाले. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले, आपल्या जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. त्या परंपरेचे जतन व संवर्धन करुन पर्यटनाला चालना देणे आवश्यक आहे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.