
सिंधुदुर्ग : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) बी. आर. गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या खळबळजनक घटनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वकिलांनी आज तीव्र निषेध केला. न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेवर झालेल्या या हल्ल्याच्या विरोधात वकिलांनी कोर्टाच्या कामकाजादरम्यान लाल फीती बांधून आपला संताप व्यक्त केला.
सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सकाळी ११.३५ वाजता सुनावणीदरम्यान ही निंदनीय घटना घडली होती. या प्रकाराची माहिती मिळताच सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय परिसरातील वकिलांनी तातडीने एकत्र येत या कृत्याचा निषेध केला.
वकिलांनी एकत्र येऊन जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग येथे स्पष्ट केले की, न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी प्रत्येक वकिलाची आहे आणि राकेश किशोर यांनी केलेले हे अशोभनीय कृत्य अत्यंत निंदनीय आहे. "या गोष्टीला एकही वकील समर्थन करणार नाही," अशी भावना उपस्थित वकिलांनी व्यक्त केली. त्यांनी एकमताने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, न्यायसंस्थेच्या सन्मानासाठी ते नेहमीच तत्पर राहतील, असा निर्धार व्यक्त केला.
एकंदरीत, सरन्यायाधीशांवरील या हल्ल्याने संपूर्ण न्यायव्यवस्थेला धक्का बसला असून, सिंधुदुर्गमधील वकिलांच्या या कृतीतून न्यायसंस्थेवरील त्यांच्या श्रद्धेचे आणि निष्ठावान भूमिकेचे दर्शन घडले आहे.










