
मालवण : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक विधान करत त्यांचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज भरड नाका येथे संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस काळे फासून त्यांचा निषेध करण्यात केला. यावेळी भिडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक विधान केले. भिडें सारखी व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल टीका टिपण्णी करते हे संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सर्व धर्म समभाव ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. परंतु ही ओळ्ख पुसण्याचा प्रयत्न भिडेंसारखे मनुवादी प्रवृत्ती करत आहेत. त्यांच्या या मनुवादी व्यक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या आदेशानुसार आज तालुका काँग्रेसच्या वतीने भरड नाका येथे भिडेंच्या प्रतिमेस काळे फासत त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी भिडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, अरविंद मोंडकर, बाळू अंधारी, सरदार ताजर, संदेश कोयंडे, इम्रान मुजावर, पराग माणगावकर, श्रेयस माणगावकर, जेम्स फर्नाडिस, योगेश्वर कुर्ले, लक्ष्मीकांत परुळेकर, समीर आंगणे, मधुकर लुडबे, केदार केळुसकर, आप्पा चव्हाण, गोविंद चव्हाण, बाळा चव्हाण, दिनकर मसुरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.