
कणकवली : केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात भरमसाट केलेल्या दर वाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग महिला आघाडीच्या वतीने कणकवली शहर पटवर्धन चौक येथे मंगळवार २८ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता महिला आघाडीच्या वतीने लक्षवेधी गॅस पे चर्चा’ आणि ‘चुलीवरची भाकरी आंदोलन करण्यात येणार आहे. गॅस सिलेंडर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे सर्व सामान्य नागरिक, गृहिणी यांचे बजेट कोलमडले असून त्यांच्या जीवनमानावर परिणाम होत आहे. गृहिणींचे मनस्वास्थ्य बिघडत आहे. ही वाढत जाणारी दरवाढ कमी व्हावी त्याचबरोबर गरिबांचे रेशन धान्य हिरावले जाणार आहे त्याविरोधात देखील धरणे आंदोलनातून निदर्शने करून निषेध केला जाणार आहे. याबाबतचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कणकवली तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, लोकसभा संघटक नेहा माने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, महिला आघाडी तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, समन्वयक सचिन सावंत, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, उमेश वाळके कणकवली तालुका आणि शहरातील सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी सदर आंदोलनाला उपस्थित राहतील. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्यचे आवाहन महिला आघाडी तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर यांनी केले आहे.