आपले स्वत्व कायमस्वरूपी जपा : डॉ. प्रसाद देवधर

सावंतवाडीत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: October 01, 2022 18:03 PM
views 182  views

सावंतवाडी : ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे दीपस्तंभ असतात. समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत विधायक संस्कार देण्याचे महान कार्य ज्येष्ठ नागरिक करतात. मात्र अलीकडे आपण कुणावर तरी विसंबून आहोत, अशी न्यूनतेची भावना ज्येष्ठ नागरिकात निर्माण झाल्याची दिसते. म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी आपले स्वत्व जोपासले पाहिजे, असे प्रतिपादन भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर यांनी येथे केले.

सावंतवाडीतील रवींद्र मंगल कार्यालयात ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. देवधर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश राऊळ, बळवंत मसुरकर, अण्णा देसाई आदी उपस्थित होते.

 प्रारंभी राज्याचे शिक्षण मंत्री केसरकर यांना ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सन्मानित करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रसाद देवधर यांनी ज्येष्ठ नागरिकांना संबोधित केले. यावेळी डॉ. देवधर म्हणाले, सामाजिक जीवनात तडजोडीचे आयुष्य कधीही ज्येष्ठांनी जगू नये. आपण आपल्या आयुष्यात कमावलेले पुण्य हीच तुमची सर्वात मोठी कमाई आहे. म्हणून कोणासमोरही हात पसरवून किंवा आपल्या मनात न्यूनतेची भावना ठेवून आयुष्य जगू नका. जीवन सुंदर आहे, त्याला तुम्ही अजून सुरेख बनवू शकतात फक्त त्यासाठी स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा. असे सांगत त्यांनी भगीरथ प्रतिष्ठानच्या कार्याचाही यावेळी ओहापोह  केला.

 दरम्यान याप्रसंगी सामाजिक कार्याने ज्येष्ठांसाठी व गरजू लोकांसाठी कार्य करणाऱ्या, वंचितांच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा 'श्रावण बाळ' पुरस्कार देऊन व काही व्यक्तींचा प्रातिनिधीक  स्वरूपात पुरस्कार देऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यात पौर्णिमा हळदणकर, प्रकाश तेंडोलकर, रवींद्र कांबळी, डी. के. सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच माजी सैनिक बापू गावडे, लक्ष्मण राणे, बापू राऊळ, सहदेव राऊळ, विजयकुमार सावंत, प्रकाश वर्दम यांचाही सन्मान करण्यात आला. समाजातील ७५, ८० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिक तसेच वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ दांपत्यांचाही सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलन गणेशप्रसाद पेडणेकर

यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुभाष गोवेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश राऊळ, अनंत माधव, भरत गावडे, बी. एन. तेली आदींनी प्रयत्न केले.