बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे आरोग्य जपा : डाॅ.मिनल सावंत

Edited by: विनायक गावस
Published on: October 21, 2023 11:49 AM
views 174  views

सावंतवाडी : स्वस्थ शरीर,स्वस्थ मन व प्रसन्न आत्मा  राखण्यासाठी  ऋतुचर्या व दिनचर्या योग्य असावी.आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार व व्यायामाची गरज असते.मानसिक आणि शारीरिक आरोग्य परस्परांवर अवलंबून आहे.निरोगी शरीरातच निरोगी मनाचे वास्तव्य असते आणि निरोगी मनच सत्वशीलवृत्ती बाळगू शकते असे प्रतिपादन डॉ. मीनल सावंत यांनी केले.श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे महिला विकास कक्षामार्फत  'मुलींचे आरोग्य' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी व्यासपीठावर महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. नीलम धुरी सदस्य डाॅ.सौ.सुनयना  जाधव .प्रा.सौ. पूनम सावंत,प्रा.सौ माधुरी ठाणेकर ,प्रा सौ  कल्पना लोबो, सौ .सुप्रिया केसरकर,प्रा  सौ हर्षदा परब उपस्थित होत्या. डॉ. मीनल सावंत म्हणाल्या, आहार आणि व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे.असमतोल आहार विहारामुळे लठ्ठपणा त्वचारोग,थायरॉईड, पाठीच्या समस्या व मुलींना भेडसावणाऱ्या समस्या आहेत.आज जेवण खाणे फास्टफूड यांना ताळतंत्र नसतो.घरगुती जेवणापेक्षा बाहेरचे खाणेआणि रात्रीची जागरणे ,व्यसनाधीनता यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.मानसिक स्वास्थ्याचा अभाव,धैर्य व सामंजस्याचा अभाव,नैराश्य ,प्रेमभंगामुळे आत्महत्या घडून येतात.मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी मनाचा खंबीरपणा,संयम राखणे त्यासाठी योगा ,ध्यानधारणा ,प्राणायाम करणे गरजेचे आहे.भक्ती, पूजन ,व्रत वैकल्यांची वैज्ञानिक पार्श्वभूमी समजून घेणे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.आपल्यातील बदल हे आरोग्याला घातक ठरणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.

सेल्फ मेडीसिन टाळा, इंटरनेटवर औषधी शोधून उपचार करणे चुकीचे व घातक आहे.अनोळखी व फसव्या लोकांकडून औषधे न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे महत्त्वाचे आहे.बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे आणि देहाचे ,संपूर्ण आरोग्य जपा  असे त्या म्हणाल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा.सौ नीलम धुरी यांनी केले. सुत्रसंचालन कु. ऐश्वर्या पेंडसे हिने केले तर आभार प्रा. सौ पूनम सावंत यांनी मानले.