देहविक्रय संघटित गुन्हेगारी : अरुण पांडे

मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसरात कार्यशाळा संपन्न
Edited by: ब्युरो
Published on: March 11, 2024 13:06 PM
views 140  views

सिंधुदुर्ग : देहविक्रय स्त्रिया का करतात, त्यापाठीमागची कारणे काय ? किंवा देहविक्रय करण्यासाठी त्या स्वतः पुढाकार घेतात कि त्यांची फसवणूक करुन अथवा त्यांचे शोषण करून त्यांना देहविक्रय करायला भाग पाडले जाते, हे प्रश्न केवळ संशोधनाचे भाग नाहीत तर चिंतनाचे विषय आहेत. कारण या सर्व प्रश्नांमागे संघटित गुन्हेगारी आहे, असे परखड विचार गोवा येथील अर्ज संस्थेचे संचालक अरुण पांडे यांनी व्यक्त केले.


सावंतवाडी येथील मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपपरिसर समाजकार्य विभागात आज सेक्स ट्रॅफिकिंग अँड सजेस्टेड इंटेर्वेंशन टू प्रिव्हेंट सेक्स ट्रॅफिकिंग इन महाराष्ट्र या वेगळ्या परंतु महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अरुण पांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रसिध्द  मानोसउपचार तज्ञ डॉ. रूपेश पाटकर, प्रा. अमर निर्मळे, प्रा. माया रहाटे, प्रा. पूनम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.


अरुण पांडे यांनी मार्गदर्शन करताना सूंदर प्रेझेंटेशन दिले.  समाजकार्य विद्यार्थ्यांना या विषयाचे गांभीर्य नेमकेपणाने समजावून सांगितले. देहविक्रयाचा प्रश्न हा समाजातील जटिल प्रश्न असून याच विषयावर अर्ज संस्था गेली तीस वर्षे गोव्यामध्ये काम करत आहे. देहविक्रयाचा प्रश्न ही संघटित गुन्हेगारी आहे त्यामुळे या विरोधात काम करताना अत्यंत योग्यरित्या करायला हवे. एका संशोधनानुसार देशात देहविक्रयात २ कोटी स्त्रिया अडकवल्या गेल्या आहेत, पण त्यांची सुटका करण्याचे प्रमाण मात्र वर्षाकाठी केवळ दीड हजार आहे. त्या महिलांना किंवा मुलींना समाजात मानसन्मान तर नसतोच पण माणूस म्हणून समाजमान्यता मिळत नाही. वास्तविक त्यांनाही माणूस म्हणून समाजमान्यता मिळायला हवी यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. समाजकार्य विद्यार्थ्यांनी हा एकूणच विषय नीटपणे समजून घेऊन शोषीत स्त्रियांच्या माणूसपणासाठी चांगल्या प्रकारे काम केले पाहिजे असेही अरुण पांडे यांनी स्पष्ट केले.


याकार्यक्रमात प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ रुपेश पाटकर यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी देहविक्रयाची समस्या नष्ट करायची असेल तर समाजकार्यकर्त्याच्या हस्तक्षेपाची भूमिका कशी असली पाहिजे, तसेच समाजामध्ये याविषयासंदर्भात जनजागृती करण्याचे काम कश्या पद्धतीने करायला हवे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षीय विद्यार्थिनी रसिक आयरे हिने केले. प्रास्तविक प्रा अमर निर्मळे आणि आभार प्रा माया रहाटे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा पुनम गायकवाड यांच्यासह विद्यार्थी - विद्यार्थींनीनी परिश्रम घेतले. सिंधुदुर्ग उपपरिसराचे संचालक श्रीपाद वेलींग यांचे कार्यशाळेसाठी बहुमोल मार्गदर्शन लाभले.