वेंगुर्ल्यात गणेश विसर्जन स्थळांचे सुयोग्य नियोजन व सुशोभीकरण

माझी वसुंधरा ४.० अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेचा उपक्रम
Edited by: दिपेश परब
Published on: September 20, 2023 18:37 PM
views 200  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला  नगरपरिषदेने माझी वसुंधरा ४.० अंतर्गत  गणेश चतुर्थी उत्‍सवाचे औचित्‍य साधून नागरीकांना पर्यावरण पुरक गणेश मुर्ती वापरण्‍याचे आवाहन केलेले होते. या आवाहनाला शहरातील बहुतांशी नागररिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून घरोघरी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तसेच प्‍लॅस्‍टीक व थर्माकोलचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने सजावट केलेली आहे. 

वेंगुर्ला नगरपरिषदेने वेशी भटवाडी आणि वडखोल भागात कृत्रिम गणेश विसर्जन तलाव तयार केलेले आहेत. सदर ठिकाणी हॅलोजन लाईटद्वारे विद्युत व्यवस्था अद्ययावत करण्यात आलेली असून विसर्जन तलावाचा परिसर आकर्षक फुलांची सजावट व रंगरंगोटी करून सुशोभित करण्यात आलेला आहे. गणेश मूर्तीचे जलप्रवाहामध्‍ये विसर्जन न करता या कृत्रिम तलावामध्‍ये विसर्जन केल्‍यास जलप्रदूषण रोखण्‍यासाठी मदत होणारी आहे. तसेच गणेश विसर्जनावेळी पाण्‍यामध्‍ये टाकण्‍यात येणारे निर्माल्‍य जमा करणेसाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सर्व विसर्जन घाटांवर माझी वसुंधरा अभियानाचे संदेश लिहिलेले निर्माल्‍य कलश ठेवण्‍यात आलेले आहेत.

वेंगुर्ला शहरातील सर्व स्वच्‍छताप्रेमी नागरीकांनी गणेश विसर्जन करतेवेळी सर्व निर्माल्‍य विसर्जन स्थळी ठेवण्‍यात आलेल्‍या निर्माल्‍य कलशामध्‍ये टाकून पर्यावरणाचे प्रदुषण रोखण्‍यासाठी सहकार्य करावे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज बनत चालली आहे. यामुळे सर्व नागरीकांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्‍यासाठी महत्वपूर्ण योगदान देवून पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा करण्‍यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.