प्रचार तोफा थंडावल्या !

कोण होणार गावचा 'सरपंच' ? उत्सुकता शिगेला !
Edited by: विनायक गांवस
Published on: December 16, 2022 19:19 PM
views 240  views

सावंतवाडी : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत धगधगणाऱ्या प्रचार तोफा अखेर आज थंडावल्या आहेत. उद्या कंदिल प्रचारावर उमेदवारांचा भर असणार असून रविवारी १८ डिसेंबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारराजा आपला कौल मतपेटीत कैद करणार आहेत. तर २० डिसेंबर रोजी गुलाल कोणाचा ? हे स्पष्ट होणार आहे. 


५२ ग्रामपंचायत निवडणूकांपैकी ३ ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्यात. तर 112 सदस्यांसह 7 सरपंच बिनविरोध निवडून आलेत. ४५ ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदासाठी चुरशीची लढत होत आहे.132 पैकी सरपंच पदासाठी 125 उमेदवार रिंगणात असून 760 पैकी 648 सदस्य रिंगणात आहेत. आजगाव, गेळे, कुडतरकर टेंब सावरवाड, नेतर्डे, सातोसे, तांबुळी, वाफोली इथं सरपंच बिनविरोध निवड झालीय. तर गेळे, कुडतरकर टेंब सावरवाड, नेतर्डे ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात. 


दरम्यान, बांदा, माजगाव, माडखोल, कारिवडे, मडूरा, , नेमळे, चराठे, वेत्ये, न्हावेली, निरवडे, तिरोडा,भालावल या ग्रामपंचायत सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. यामध्ये बांद्यात भाजपच्या प्रियांका नाईक विरूद्ध शहर विकासच्या अर्चना पांगम अशी थेट लढत होत असून काटेकी टक्कर या दोघांत आहे. तर माजगावमध्ये युतीच्या डॉ. अर्चना सावंत विरूद्ध महाविकासच्या संजना सावंत अशी सावंत विरूद्ध सावंत लढत होत आहे. दोघांनीही आपली संपूर्ण ताकद लावल्यानं कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलं आहे. तर माडखोलमध्ये भाजप समोर गाव विकास पॅनलनं कडव आव्हान उभ केल आहे. कारीवडे, कुणकेरीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात फुट पडून स्वतंत्र पॅनल उभी असून लढत होत आहे. तर चराठ्यात पंचरंगी लढत होत आहे. नेमळे, न्हावेली, निरवडे, ओटवणे सोनुर्लीतही काटेकी टक्कर पहायला मिळते आहे.


विहीरीच मनोगत, कचरा डेपोच मनोगत, भ्रष्टाचारासह आरोप- प्रत्यारोपामुळे गावच वातावरण चांगलच तापल आहे. भाजपसह युतीतून लढणारा बाळासाहेबांची शिवसेना पक्ष शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ताकदीन रिंगणात उतरलाय. तर शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कॉग्रेसन देखील भाजपसमोर आव्हान उभी केली असून सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.