प्रचार तोफा थंडावल्या...!

कंदील प्रचाराल जोर ; उद्याचा दिवस निर्णायक
Edited by:
Published on: November 18, 2024 18:46 PM
views 143  views

सावंतवाडी : मागील पंधरा दिवसापासून घमासान सुरू असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची आज सायंकाळी ५ वाजता सांगता झाली. आरोप, प्रत्यारोपासह आश्वासनाने धडाडणाऱ्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता गुप्त बैठका, राजकीय डावपेच रंगणार असून कंदील प्रचाराला जोर आला आहे.

जाहीर प्रचार बंद झाला असला तरी  गुप्त बैठकांचे सत्रही याच काळात होणार आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदानापूर्वीचे दोन दिवस महत्त्वाचे आहेत. निवडणूक विभाग, पोलिस यंत्रणा यांची स्थिर आणि फिरती पथके अधिक सक्रिय आहेत. उमेदवार, राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालीवरही त्यांची नजर राहणार आहे. त्यापूर्वी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरण्यात येणार आहे. यावेळी निवडणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रचार करताना हायटेक प्रचार यंत्रणेचा उपयोग केला गेला आहे. 

20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 310 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी तहसील कार्यालय येथे पार पडेल  मतदारसंघात 2 लाख 28 हजार 483 मतदार आहेत. यात महिला 1 लाख 14 हजार 433 व 1लाख 14हजार 050 पुरूष मतदार आहेत. सहा उमेदवार रिंगणात असून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली, बंडखोर अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब, विशाल परब यांच्या चौरंगी लढत होणार आहे. अपक्ष उमेदवार सुनील पेडणेकर, श्री. गांवकर हे देखील मैदानात आहेत. लोकसभेला नोटा पर्याय निवडणारे मतदार देखील अधिक होते. या विधानसभेत केसरकर चौकार मारतात की तेली खात उघडतात याकडे सर्वांचे लक्ष असून अपक्ष घारे आणि परबांची बंडखोरी कोणाच्या हिताची ठरते अन् कोणाला फटका देऊन जाते हे चार दिवसांत स्पष्ट होणार आहे.