
वेंगुर्ला : सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस प्रसिद्ध केल्याबद्दल मंगळवार २३ जानेवारी रोजी वेंगुर्ल्यात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी शहरातील शेकडो जण एकवटले होते. रात्री २ वाजेपर्यंत शहरात तणावाचे वातावरण होते. या प्रकारामुळे वेंगुर्ले शहरात आज जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
राम प्राणप्रतिष्ठापन सोहळा संपन्न होत असताना वेंगुर्ला शहरातील काहींनी सोशल मिडीयावर भावना दुखावणारे स्टेटस स्टोरीला लावल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या. तरी या प्रवृत्तीवर कारवाई करण्याची मागणी सुरुवातीला भाजप युवा मोर्चा सहित काही युवकांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात केली. यावेळी वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडोंच्या संख्येने लोक एकवटले होते. दरम्यान मच्छिंद्र प्रताप मोरे यांनी वेंगुर्ले पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार त्या दोन युवक व युवतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम, अभिषेक वेंगुर्लेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, हितेश धुरी, भूषण सारंग, परबवाडा उपसरपंच पपू परब, प्रीतम सावंत, भाई मालवणकर, अमित म्हापणकर, पंकज शिरसाट, वृंदा मोर्डेकर, रवी शिरसाट, प्रणव गावडे, सुधीर पालयेकर, चतुर पार्सेकर, अमित म्हापणकर यांच्यासाहित इतर लोकप्रतिनिधीनी उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांच्याशी चर्चा करून जमाव शांत करण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान यावेळी जमलेल्या जमावाने पिराचा दर्गा मशिदीकडे जात जोरदार घोषणाबाजी करून येथील काही दुकानांची तोडफोड केली. तसेच बाजारपेठ मधीलही काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. यावेळी वेंगुर्ले मध्ये दंगल नियंत्रण पथक दाखल झाले होते. दरम्यान रात्री उशिरा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी वेंगुर्ले मध्ये दाखल होत पुढील आदेश येई पर्यंत जमावबंदीचे १४४ कलम लागू करून जमावाला हटवले.
दरम्यान या घटनेचा मुस्लिम समाजाच्यावतीनेही निषेध करण्यात आला. या घटनेच आम्ही समर्थन करत नाही. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुस्लिम समाजाचे कॅम्प जमात अध्यक्ष निहाल शेख व रफिक शेख यांनी दिली.