प्रगत सिंधुदुर्गचा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला विरोध..!

जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांना परवानगी देऊ नये याबाबत देण्यात आली निवेदने.
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 30, 2023 14:55 PM
views 1233  views

कुडाळ : राज्यभरात वादग्रस्त ठरलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील हिचा सबसे कातील गौतमी पाटील डान्स शोज आयोजित करण्यात येत आहेत. आयोजकांनी तिकीट विक्रीही चालू केली असून, या  शो संदर्भात तरूणाईला आकर्षित करण्यासाठी, सोशल मीडियावरून विविध जाहिराती फलक फिरवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तरी या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे निवेदन प्रगत सिंधुदुर्ग चे संस्थापक अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना दिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये गौतमी पाटील चे डान्स शो वादग्रस्त ठरून विभत्स व अश्लिलतेचे प्रदर्शन करणारे व तरुणाईस एकप्रकारे उत्तेजित करणारे ठरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सामाजिक संस्कृती पाहता, जिल्ह्यात भजन, किर्तन, दशावतार, फुगडी, अशा लोककला जपण्याचे काम समाजात रुजलेले असताना, असे कार्यक्रम जिल्ह्यात होणे जिल्ह्याच्या सांस्कृतिक प्रतिमेला काळीमा फासणारे आहे. शिवाय या अशा कार्यक्रमांमुळे तरुणाई उत्तेजित होऊन त्यांचेकडून हुल्लडबाजी वा इतर आक्षेपार्ह वर्तन घडल्यास पोलिसांची डोकेदुखी वाढण्याचे संभवते. राज्यात“ तमाशा " या लोककलेबद्दल लोकांच्या मनात आदर आहे, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही तमाशाची संस्कृती इथल्या जागरूक व चिकित्सक समाजाने रुजू दिली नाही. मग अशी आपली सांस्कृतिक परंपरा असताना असे विभत्स व अश्लिलतेचे प्रदर्शन करणारे डान्स शोज, फक्त पैशांच्या हव्यासापोटी आयोजित करून, जिल्ह्यातील तरुणांची माथी भडकवणे योग्य नाही अशी आमची धारणा आहे. या निवेदनात म्हटले आहे.

आपल्या शेजारील कोल्हापूर जिल्ह्याने अशा कार्यक्रमांना बंदी घातली असून, जीवित समाजमनाने हे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. आपल्या जिल्ह्यात हक्काच्या मागण्यांसाठी किंवा न्यायासाठी होणारी आंदोलने, उपोषणे, प्रशासनाकडून शांततेच्या नावाखाली दडपली जातात, मग या अशा कार्यक्रमाना राजाश्रय पोलीस प्रशासन देणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून, कृपया पोलीस प्रशासनाने या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून, जिल्ह्यात होवू घातलेल्या सबसे कातील गौतमी पाटील या कार्यक्रमांना परवानगी नाकारावी व भविष्यात असे कार्यक्रम आयोजित न करण्या बाबत आयोजकांना समाज  द्यावी  अशी आग्रही मागणी ही जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रगत सिंधुदुर्ग चे संस्थापक अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी केली आहे.