
सिंधुदुर्गनगरी : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' वृत्तपत्र ६ जानेवारीला सुरू केले. यानिमित्ताने साजरा होणारा पत्रकार दिनाचा कार्यक्रम सिंधुदुर्ग नगरी येथील नवीन जिल्हा नियोजन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, भोसले नॉलेज सिटीचे कार्यकारी अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व मुख्यालय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित या कार्यक्रमात पत्रकार पुरस्कार वितरण केले जाणार आहे.
जिल्हा पत्रकार संघाचे पहिले अध्यक्ष कै. जयानंद मठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार देवगडचे ज्येष्ठ पत्रकार संतोष कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे देण्यात येणारे पुरस्कार ग्रामीण पत्रकार पुरस्कार मालवणचे तालुकाध्यक्ष संतोष गावडे, युवा पत्रकार पुरस्कार दोडामार्ग येथील संदेश देसाई तसेच आदर्श पत्रकार पुरस्कार वेंगुर्ल्याचे सीताराम धुरी, कुडाळचे नीलेश उर्फ बंडया जोशी, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, कणकवलीचे तुषार सावंत, सावंतवाडीचे सचिन रेडकर, वैभववाडीचे उज्ज्वल नारकर यांना यावेळी वितरित करण्यात येणार आहेत. तसेच यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या ओळखपत्रांचे वितरणही करण्यात येणार आहे.
या संदर्भातील नियोजनाची बैठक सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. यावेळी उपाध्यक्ष बाळ खडपकर, रमेश जोगळे, दाजी नाईक, सचिव देवयानी वरसकर, कार्यकारणी सदस्य संतोष राऊळ, महेश सरनाईक, राजन नाईक, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, मुख्यालय पत्रकार समिती अध्यक्ष संजय वालावलकर, सचिव मनोज वारंग आदि उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव देवयानी वरसकर यांनी केले आहे.