'प्रोफेशनल कम्युनिकेशन' शैक्षणिक पुस्तकाचे प्रकाशन

प्रा. डॉ. लीना जावकर यांचं पुस्तक
Edited by: मनोज पवार
Published on: February 12, 2025 11:53 AM
views 121  views

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या प्राध्यापिका डॉ. लीना जितेंद्र जावकर यांनी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी लिहिलेल्या आणि पुण्यातील निराली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 'प्रोफेशनल कम्युनिकेशन' या पुस्तकाचे प्रकाशन आमदार शेखर निकम यांच्याहस्ते झाले. शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पुणे येथील निराली प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या इंग्रजी भाषेतील अडचणी लक्षात घेऊन प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमावर आधारित हे पुस्तक आहे.  

अभियांत्रिकी पदविकेच्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त असल्याचे मत आ. निकम यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आपल्या मनोगतात बोलताना डॉ. जावकर म्हणाल्या की, ‘पुस्तकाचे प्रकाशन, संस्थेचे चेअरमन आणि चिपळूण-संगमेश्वर तालुक्याचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या निराली प्रकाशन यांच्यातर्फे होणे ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हे पुस्तक प्रकाशित होण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य मंगेश भोसले आणि निराली प्रकाशन समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर जिग्नेश फुरिया, कोकण-गोवा प्रतिनिधी धीरज वाटेकर यांचे मोलाचे सहकार्य मिळालेले आहे. कोकण सारख्या दुर्गम भागात शिक्षण घेणाऱ्या, खेड्यापाड्यातून माध्यमिक शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी शहराकडे धाव घेणाऱ्या  मुलांना professional communiction हे सरळ साध्या भाषेत समजावे. उद्योग क्षेत्राला अपेक्षित असणारे ऑफिस ड्राफ्टिंगचे नवीन फॉरमॅट विद्यार्थ्यांपर्यंत  पोहचावेत यासाठी हे लेखन केले आहे.’ प्राचार्य मंगेश भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी पुस्तक निराली प्रकाशन कडून प्रसिद्ध करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच निराली प्रकाशनचे मॅनेजिंग डायरेक्टर फुरिया यांच्या संदेशाचे वाचन केले. निराली प्रकाशनचे प्रतिनिधी आणि कोकणातील लेखक-पत्रकार धीरज वाटेकर यांनी उपस्थितांना प्रकाशनाविषयी माहिती दिली. अनिरुद्ध निकम यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय शिक्षणातील अनुभवांच्या आधारे अशा पुस्तकांच्या आवश्यकतेवर यावर भाष्य केले. 


यावेळी विनती ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी सचिन खरे, नगरपरिषद खेडचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, परिमल भोसले, विकी नरळकर, विजय चितळे, भाजपा सरचिटणीस विनायक वरवडेकर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणचे उपाध्यक्ष दिलीप आंब्रे, जावकर-मोरे कुटुंबीय, विद्यार्थी आणि  हितचिंतक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सह्याद्री पॉलिटेक्निकच्या प्रा. पल्लवी बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्नीकल टीमने केले होते.