
वैभववाडी : येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील मराठी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका सौ. संजीवनी सुरेश पाटील यांना शिक्षक भारतीचा नारीशक्ती पुरस्कार- २०२२-२३ देऊन गौरविण्यात आले.
मंगळवार दिनांक ३ जानेवारी रोजी वैभवी सखी मंचच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सुवर्णा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. सौ. पाटील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात १९९४ पासून मराठी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच
सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदान व प्रभावी सूत्रसंचालन अशा विविधांगी कार्याची दखल घेऊन 'शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी' हे ब्रीद घेऊन काम करणारी शिक्षक भारती या शासनमान्य संघटनेच्यावतीने दि. ३ जानेवारी २०२३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी प्रा. सौ. संजीवनी पाटील यांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन वैभवी सखी मंचच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा रावराणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शिक्षक भारती वैभववाडीचे अध्यक्ष अविनाश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष डी. एस. पाटील, सचिव स्वप्निल पाटील, नानिवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक शिरीष शेंबवणेकर व वैभवी सखी म्हणजे अध्यक्ष सुवर्णा रावराणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक एस. पी. परब, तिथवली हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. मेस्त्री, जाधव सर, करूळ सर, माळवी सर, गणेश टकले सर, संजय तुळसकर, प्रा. एस. एन. पाटील व सखी मंचच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. पाटील यांनी केले. स्वप्नील पाटील यांनी आभार मानले.