स्व.प्रा.मिलिंद भोसले व कै. ॲड. दीपक नेवगी स्मृतीप्रीत्यर्थ पुरस्कार जाहीर

प्रा. संजय कात्रे, सतिश पाटणकर यांचा 'कोमसाप' करणार गौरव
Edited by: विनायक गावस
Published on: March 12, 2024 07:01 AM
views 95  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्यावतीने कोमसापच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान देणारे शाखेचे दिवंगत सदस्य, स्व.प्रा. मिलिंद दत्ताजीराव भोसले व कै. ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कोमसाप शाखा सावंतवाडी कडून यावर्षी प्रथमच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना नुकत्याच झालेल्या कोमसाप कार्यकारिणीच्या सभेत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत‌. स्व.प्रा ‌मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुरस्कार  निवेदक, आदर्श शिक्षक प्रा. संजय कात्रे तर कै.ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुरस्कार साहित्यिक, नाटककार, पत्रकार आणि मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतिश पाटणकर यांना जाहीर करण्यात आले आहेत. यावेळी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीस अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, केंद्रीय कार्यकारणी सदस्य सौ. उषा परब, जिल्हा कार्यकारणी कोषाध्यक्ष भरत गावडे, सदस्य  दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, ॲड. नकुल पार्सेकर, विनायक गांवस आदी उपस्थित होते.


 १५ मार्च रोजी सकाळी १० वा. राणी पार्वतीदेवी हायस्कूल  सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत तर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती यावेळी राहणार आहे‌त. तसेच मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कोमसापने आयोजित केलेल्या शालेय स्तरावरील  निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात येणार आहे. ही स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांच्या मातोश्री स्व. सौ. मंदा टेंबकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती‌. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सहसचिव राजू तावडे यांनी केले आहे.