प्रा.मधु दंडवते देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले नेते : कवी अजय कांडर

Edited by: विनायक गावस
Published on: October 14, 2023 18:11 PM
views 96  views

सावंतवाडी : कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते हे देशाचे रेल्वेमंत्री आणि अर्थमंत्री होते. हा त्यांचा कार्यकाल दूरदृष्टीचा असल्यामुळेच कोकण रेल्वेचे स्वप्न साकारू शकले. त्यांच्यामध्ये देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता होती आणि ती त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत वेळोवेळी सिद्ध केली. त्यामुळे लेखक संजय रेंदाळकर यांनी निर्मिती केलेल्या प्रा.दंडवते यांच्या वरील 'ध्यासपर्व' या ग्रंथाचे मोल मोठे आहे असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी केले.

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथील प्रा.दंडवते प्रतिमे समोर कवी कांडर यांच्या हस्ते सदर ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रसिध्द ललित लेखक प्रा वैभव साटम, कवी मधुकर मातोंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना कांडर यांनी प्रा.दंडवते यांनी अर्थमंत्री असताना कोकण रेल्वे प्रकल्पाचे अर्थ नियोजन केले नसते तर हा प्रकल्प भविष्यात कधी सुरू झाला असता हे निश्चित सांगताच आले नसते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या प्रकल्पामुळे जो कोकणचा कायापालट झाला त्यात प्रा.दंडवते यांचे महत्वपूर्ण योगदान आहे असेही आग्रहाने सांगितले.यावेळी संजय पुरळकर, कवी सत्यवान साटम,प्रसिद्ध भजनी बुवा भिवा गावडे आदी उपस्थित होते.

प्रा.साटम म्हणाले, प्रा.मधु दंडवते यांची संसदीय कारकीर्द अभ्यासपूर्ण, सचोटीची होती. त्यांनी मंत्री म्हणून खऱ्या अर्थाने न्यायिक काम केले. त्यामुळे सर्वसामान्य स्तरावरून त्यांना जनाधार प्राप्त झाला. त्याचबरोबर त्यांच्या कामगिरीचे उच्चस्तरावरूनही कौतुक झाले. प्रा. दंडवते यांच्या संसदीय कामगिरी संदर्भात भारताचे माजी राष्ट्रपती एन. एस. रेड्डी म्हणतात, "जर मंत्रालयाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल एखादे सुवर्णपदक ठेवले असते तर त्यासाठी मी प्रा. मधू दंडवते यांच्या नावाची शिफारस केली असती.