
सावंतवाडी : येथील राणी पार्वती देवी कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले इंग्रजी विषयाचे प्राध्यापक तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांना मराठी साहित्य विश्वातील मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार गुरुवारी जाहीर झाला. त्यानिमित्ताने प्रा. बांदेकर यांचा कोकणचे नंबर वन महाचॅनेल कोकणसाद LIVE व कोकणचे प्रथम दैनिक कोकणसादच्या वतीने प्रदान कार्यालयात सस्नेह सत्कार करण्यात आला.
मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी प्रा. प्रवीण बांदेकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान केला. यावेळी कार्यकारी संपादक अर्जुन धस्के, वरिष्ठ उपसंपादक रवींद्र जाधव, उपसंपादक प्रा. रुपेश पाटील, न्यूज अँकर आणि उपसंपादक जुईली पांगम, सावंतवाडी तालुका प्रतिनिधी विनायक गांवस यांसह टीम कोकणसाद उपस्थित होते.
यावेळी मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी सांगितले की, आपल्या तळकोकणातील साहित्यिकांनी आपल्या अजरामर साहित्य लेखनीने भारतीय साहित्य क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्याच पावलावर पाऊल टाकत प्रा. प्रवीण बांदेकरांनी 'चाळेगत', 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' अशा दर्जेदार कादंबरी लेखन करून मराठी साहित्याला एक वेगळा आयाम दिला आहे. त्यामुळे त्यांचा संपूर्ण कोकणाला अभिमान आहे. तसाच कोकणसाद लाईव्हला देखील अभिमान आहे.
दरम्यान, सत्काराला उत्तर देत कादंबरीकार प्रा. बांदेकर म्हणाले की, आपल्या साहित्यातून जनमानसांचे कष्ट, त्यांची वेदना आणि त्यांची जगण्याची धडपड आपण सातत्याने लेखनातून मांडली आहे. तरी देखील अजूनही बरेच काम करायचे आहे. कोकणसादने मला सातत्याने पाठबळ दिले आहे. म्हणून मी कोकणसादचा नेहमी ऋणी राहील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी प्रा. रुपेश पाटील यांनी प्रा. बांदेकरांची मुलाखत घेऊन त्यांचा आजपर्यंतचा साहित्यप्रवास उलगडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुईली पांगम यांनी केले तर आभार प्रदर्शन विनायक गावस यांनी केले.