प्रा. हरिभाऊ भिसे यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार जाहीर

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 25, 2025 20:39 PM
views 103  views

कणकवली : येथील प्रसिद्ध कलावंत व शाहीर प्रा.हरिभाऊ भिसे यांना कोल्हापूर येथील मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व दीक्षा फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. 

प्रा. हरिभाऊ भिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवारी 29 जून 2025 रोजी   12.30 वाजता राजर्षी शाहू सांस्कृतिक भवन कोल्हापूर येथे आयोजित एका खास समारंभात प्राध्यापक हरिभाऊ भिसे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मानाचा कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह मानपत्र, राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा आणि अकरा हजार रुपयाची ग्रंथ संपदा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

प्राध्यापक हरिभाऊ भिसे हे नुकतेच कणकवली महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले असून अक्षरसिंधू  साहित्य कला मंच सिंधुदुर्ग, सिंधुगर्जना ढोल ताशा पथक  कणकवली, कणकवली अर्बन निधी बँक, ज्ञानदा शिक्षण संस्था संस्थापक आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे, आयडियल नर्सिं स्कूल कणकवली, वृद्ध कलाकार व साहित्त्यिक मानधन समिती सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष, रोटरी क्लब चार्टर  मेंबर, सिंधुदुर्ग दक्षता समिती सदस्य,रंगखांब ग्रुप कणकवली, शाहिरी लोक कला  गोंधळ लोककला मंच अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाज प्रबोधन कार्यात व लोककला जपण्यात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल भिसे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.