प्रा. डॉ. लळीत यांच्या 'सिंधुरत्ने' ग्रंथाचे उद्या सावंतवाडी येथे प्रकाशन

ग्रंथाच्या पहिल्या भागात एकूण ४९ मान्यवरांच्या चरित्रांचा समावेश
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 18, 2023 19:47 PM
views 160  views

सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील दिग्गज व मान्यवर व्यक्तींचा परिचय करून देणाऱ्या प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्या 'सिंधुरत्ने' या ग्रंथाचे प्रकाशन रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी होत आहे. सावंतवाडी राजवाड्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात युवराज लखमराजे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी व सिंधुदुर्गवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लेखक प्रा. डॉ. लळीत यांनी केले आहे


 सिंधुदुर्ग जिल्हा ही नररत्नांची खाण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्म घेतलेल्या अनेक दिग्गज व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात होऊन गेल्या. कालौघात या मान्यवरांचे काहीसे विस्मरण झाले आहे. या दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा परिचय या ग्रंथातून देण्यात आला आहे. ग्रंथाच्या पहिल्या भागात एकूण ४९ मान्यवरांच्या चरित्रांचा समावेश आहे. पुणे येथील अक्षरधन प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. प्रा. डॉ. लळीत हे दोडामार्ग तालुक्यातील आडाळीचे रहिवासी असून मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्राचे अध्यक्ष आहेत. सध्या ते शिरुर (पुणे) येथील सी. टी. बोरा महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख आहेत. या ग्रंथाचा दुसरा भाग लवकरच प्रकाशित होईल.