प्रा. रुपेश पाटील यांचे अभिनेते संजय खापरे यांनी केले कौतुक

Edited by: विनायक गांवस
Published on: December 30, 2024 17:37 PM
views 190  views

सावंतवाडी :  सावंतवाडी येथील निवेदक व व्याख्याते प्रा . रुपेश पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथील राजश्री शाहू महाराज सभागृहात संपन्न झालेल्या आई महालक्ष्मी संमेलन २०२४- या रंगारंग सोहळ्याचे आपल्या अनोख्या, ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून उपस्थित असलेले मराठी चित्रपट अभिनेते व निर्माते संजय खापरे यांनी प्रा. रुपेश पाटील यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाचे तोंड भरून कौतुक करत दाद दिली.

दरम्यान, समृद्धी प्रकाशन, स्वप्नपूर्ती फाऊंडेशन, कोल्हापूर जिद्द फाऊंडेशन, कोल्हापूर, वेद फाऊंडेशन, इचलकरंजी, स्वामी एंटरप्राइजेस, कोल्हापूर, आयोजित आई महालक्ष्मी संमेलन, कोल्हापूर येथे संपन्न झाले. यात प्रा. रूपेश पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्राच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल संजय खापरे यांच्या हस्ते त्यांना 'महाराष्ट्र - एज्युकेशनल अँड सोशल आयकॉन' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चित्रपट व मालिका निर्माते संदीप राक्षे, कोल्हापूर येथील यशस्वी उद्योजिका पूनम मोरे, डॉ. मोहन गोखले, विनोद नाझरे, डॉ. बाळकृष्ण खरात, डॉ. रजनीताई शिंदे, सौ. गीतांजली डोंबे यांचेसह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.