विविध संघटनांनी निलेश राणेंसमोर मांडल्या समस्या

समस्या सोडवण्यास प्रयत्नशील ; निलेश राणेंनी दिली ग्वाही
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 15, 2022 18:57 PM
views 139  views

मालवण : मालवण तालुक्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी हडी ग्रामपंचायत येथे माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. या समस्या शासन स्तरावर सोडवण्याची मागणी त्यांनी निलेश राणे यांच्याकडे केली आहे. 


दरम्यान, संघटना प्रतिनिधींनी मांडलेल्या लेखी स्वरूपातील सर्व समस्या शासन दरबारी संबंधित मंत्री स्तरावर मांडून लवकरात लवकर सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी या निमित्ताने स्पष्ट केले.


सरपंच संघटना, वाळू, चिरे, ठेकेदार, वीज वितरण, बांधकाम, किल्ला होडी, जेटी स्टोल धारकं यासह विविध संघटनांना येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी हडी ग्रामपंचायत येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले  होते. यावेळी निलेश राणे यांनी प्रत्येक संघटना प्रतिनिधी यांच्याशी स्वतंत्र भेट घेत चर्चा केली. आपले प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही निलेश राणे यांनी उपस्थितांना दिली.


यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, संतोष साटविलकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, हडी सरपंच महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, राजन गावकर, महेश बागवे, दादा नाईक, संतोष गावकर, दीपक सुर्वे, शेखर कांबळी यासह अन्य पदाधिकारी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.