युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये पारितोषिक वितरण समारंभ

डॉ. राकेश हसबे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
Edited by: मनोज पवार
Published on: July 10, 2025 11:53 AM
views 218  views

चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये आज पारितोषिक वितरणाचा भव्य समारंभ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात मागील वर्षातील शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष आकर्षण ठरले ते शाळेचे २००३ चे माजी विद्यार्थी आणि चिपळूणमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राकेश हसबे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्री. विभाकर वाचासिद्ध, पर्यवेक्षिका रेवती कारदगे, शिक्षक प्रतिनिधी श्री. मोटगी, आणि प्रमुख अतिथी डॉ. हसबे यांची उपस्थिती होती. पूजनानंतर श्री. मोटगी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली आणि प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन डॉ. हसबे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात एकूण ४७ विद्यार्थ्यांना विविध विषयांतील उल्लेखनीय शैक्षणिक यशासाठी पारितोषिके प्रदान करण्यात आली. पारितोषिक विजेत्यांचे नाव पुकारताच सभागृहात टाळ्यांचा गजर ऐकायला मिळाला. पालक व शिक्षकांचा चेहराही आनंदाने उजळलेला दिसून येत होता.


प्रमुख पाहुणे डॉ. राकेश हसबे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वतःच्या शालेय आठवणी, संघर्षाची कहाणी व वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “स्वप्नं मोठी पाहा आणि त्यासाठी मेहनतीची तयारी ठेवा. यश म्हणजे एका दिवसाचे काम नाही, तो एक सतत चालणारा प्रवास आहे,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी संस्थेच्या सदस्या व शाळा समिती सदस्य वैशाली निमकर उपस्थित होत्या. पालक प्रतिनिधी व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने या समारंभाला उपस्थित राहिले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका सौ. वैशाली चितळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. खेडेकर यांनी केले. विद्या समितीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने व शाळेच्या शिक्षकवृंदाच्या संयोजनाने हा समारंभ अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. शाळेच्या परिसरात ज्ञान, प्रेरणा व गौरवाचे वातावरण अनुभवायला मिळाले आणि विद्यार्थ्यांसह पालकांनाही हा दिवस संस्मरणीय ठरला.