
सावंतवाडी : शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा सावंतवाडीत पार पडला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मतदारसंघाचे आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल करत मान ठेवतोय तर मान घ्या, नाहीतर सगळं जनतेला सांगाव लागेल असा इशारा दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोडवे गात स्थानिक भाजप नेत्यांचे मात्र कान टोचले.
यावेळी केसरकर म्हणाले, संपर्क प्रमुख रविंद्र फाटक हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळेल. पाच वर्ष अर्थराज्यमंत्री म्हणून राज्याच बजेट मांडल. मात्र, यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणला न्याय देण्यासाठी मला बजेट मांडायला संधी दिली. आज जगात नरेंद्र मोदींचा गवगवा आहे. इतर देश त्यांच मार्गदर्शन घेतात. एवढे मोठे नेते देशाचे पंतप्रधान आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु, संजय राऊत यांनी रोज सकाळी उठून त्यांच्याविरुद्ध सामनात लिहण, बोलण हे योग्य नव्हत. महाविकास आघाडीला लोकांचं बहुमत नव्हत. बहुमत हे आम्हाला भाजप-शिवसेना युतीला होत. आज राज्यात जनमताच सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे खरे गद्दार तुम्ही आहात, आम्ही नाही. जनमताचा आम्ही आदर केला आहे अस वक्तव्य केले. तर खोक्याचा अर्थ काय ? तुम्हाला पैसे आम्ही पुरविले. मी प्रॉपर्टी विकून पक्षाला पैसे दिलेत. आमच्या माजी मुख्यमंत्र्यांना काजू म्हणजे काय, बोंडू काय असतो ते माहीत नाही.
ते म्हणाले, कोकणावर तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी अन्याय केलेला असताना मी सभागृहात बोलत असताना आदीत्य ठाकरे हसत होते. आदीत्य ठाकरे कधी स्वतःच्या कार्यालयात जावू शकले नाही. घरी बसायच, केबीन मध्ये बसायच आमदार, खासदारांना, शिवसैनिकांना भेटायचं नाही असं काम यांनी केले. उद्धव साहेबांच समजू शकतो पण, २८ वर्षांचा युवक काय करत होता ? ह्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली का ? असा सवाल केला.
ते म्हणाले, ज्यावेळी शिवसैनिकांना जिल्ह्यात फिरणं कठीण होत, कुणी रहायला हॉटेल देत नव्हत, एवढी नारायण राणेंची पकड जिल्ह्यात होती. मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलो तेव्हा शिवसेनेला जिल्ह्यात यश संपादन करता आलं. याची जाणीव ठेवण आवश्यक होत. शिवसेना सोडून गेलेले निवडून येत नाही असं म्हणता पण, सेनेतून बाहेर पडलेल्या नारायण राणेंनी १२ पैकी ११ आमदार निवडणून आणले. ही कोकणी माणसाची ताकद आहे. आम्ही तुमचा आदर ठेवतो. पण, तुम्ही आमच्यावर बोलत राहिला तर आम्हाला देखील बोलावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासोबत उद्धव ठाकरेंची भेट घालून दिली तेव्हा महाविकास आघाडी करून चूक केल्याच उद्धव ठाकरेंनी मान्य केल.राज्यात येऊन भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच त्यांनी सांगितल होत असा गौप्यस्फोट केला.
माझ्या मतदारसंघात एका महिलेला घेऊन जयंत पाटील फिरत होते. हाच आमदारकीचा राष्ट्रवादीचा उमेदवार असल्याचं सांगत होते. यावेळी शिवसेनेचा आमदार टीकला पाहिजे असं उद्धव ठाकरेंना नाही वाटल. आदीत्य ठाकरे लहानपणापासून खोक्यांसोबत खेळले म्हणून खोके-खोके करतात. मी मुख्य प्रवक्ता आहे. मान ठेवतोय तर तो मान घ्या. नाहीतर सगळं जनतेला सांगाव लागेल असा इशारा केसरकर यांनी दिला.
दरम्यान, मला एक राज्यमंत्री पद सोडावे लागणार होतं. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी ते होऊ दिलं नाही. आज शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये मी कॅबिनेट मंत्री आहे. हे आमचं सेना-भाजपच नातं आहे. इथले भाजपचे लोक काय महणतात याकडे मी लक्ष देत नाही. आजवर पराभव पत्करावा लागल्यान आपला स्वार्थ साधण्यासाठी माझावर टीका करत आहेत. एवढीच इच्छा आहे तर रविंद्र फाटक यांच्याकडे विधानपरिषदेसाठी शिफारस केली असती, असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच नाव न घेता लगावला.
पुन्हा खोके म्हणाल तर महाराष्ट्रात तोंड वर काढू शकणार नाहीत, अशा घोषणा आम्हाला बाहेर काढाव्या लागतील. आम्ही कुणाकडून एक रूपया घेतलेला नाही. असेल तर ते सिद्ध करा, नाहीतर तुम्ही घेतले हे आम्ही सिद्ध करतो. प्रामाणिक मंत्र्यांना मंत्रीपद ठाकरेंनी का नाकारली ? याची कारणं सांगितली तर काय होईल, याचा विचार करा. एकनाथ शिंदे यांनी एक रूपया सुद्धा आमच्याकडून मंत्रीपदासाठी घेतला नाही. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांची साथ असल्यानं शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान देत आहे.
कॉंग्रेस, राष्ट्रवादीला सोडा असं आम्ही सांगितलं. मुख्यमंत्री पद सोडा असं सांगितलं नाही. तेव्हा आपणच आम्हाला तुम्हीसुद्धा त्यांच्यासोबत जा, असं सांगितलं. म्हणूनच तुमचं नाव आणि चिन्ह गेलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणाऱ्या राहुल गांधींना मिठ्या मारणाऱ्या कॉग्रेस, राष्ट्रवादीला विकला गेलेला हा गट आहे आम्ही त्यात नाही. आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे झेंडा अन् विचार घेऊन पुढे घेऊन जाणार आहे. सहा महिन्यांत खोके बंद झाल्यान हा पोटशूळ उठला आहे. मी पालकमंत्री मुंबई, कोल्हापूरचा असलो तरी जिल्ह्यात लक्ष आहे. नितेश राणेंच्या प्रचाराला फिरलेलो तसा तुमच्यासाठी फिरेन, त्यासाठी विशेष गाडी सुद्धा मागवत आहे. मित्रपक्ष भाजप-सेना युतीच राज्य महाराष्ट्रासह जिल्ह्यात येईल यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं मत मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.