
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले वेतन, पदोन्नती, पेन्शन व प्रशासकीय अडचणींमुळे शिक्षक वर्गात तीव्र नाराजी असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाकडे एकूण ३६ मागण्या सादर केल्या आहेत. यामध्ये २००५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, २००५ पूर्वीच्या शिक्षण सेवकांच्या डीसीपीएस खात्यातील रक्कम व सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी भविष्य निर्वाह निधीत वर्ग करणे, निवड व वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळावा, याकरिता प्रशासकीय कामांसाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नतीचे प्रश्न, जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या वेतनवाढीचे प्रस्ताव, शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी लागू करणे, चुकीच्या पद्धतीने कपात झालेली डीसीपीएस रक्कम परत देणे, याबाबतही निर्णय अपेक्षित असल्याचे संघटनेने नमूद केले.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील अनुदान वेळेत मिळणे, शालेय वेळापत्रक पूर्ववत करणे, चटोपाध्याय वेतनश्रेणीचा फरक देणे, पगार वेळेत न होण्याचा प्रश्न सोडवणे, दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी तयार करणे आदी मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, तुषार आरोसकर, नामदेव जांभवडेकर , संतोष परब, राजू वजराटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काही महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत संघटने विविध प्रलंबित समस्यांबाबत चर्चा केली होती. त्यावेळी सीईओ यांनी ते प्रश्न कधीपर्यंत सोडविले जातील ते सांगितले होते. मात्र अद्याप एकही समस्या मिटलेली नाही. मेडिकल बिलांसह अनेक समस्या आणि मागण्यांच्या फाईल सीईओ यांच्या टेबलवर पडून आहेत. ते त्यांकडे लक्षही देत नसल्याचा आरोप यावेळी शिक्षकाकडून करण्यात आला.










