
सावंतवाडी : कोकणी माणूस आज शासकीय सेवेत कमी दिसतो. याची कारण आपण शोधली पाहिजेत. इथल्या राजकारण्यांनी, अभ्यासू लोकांनी यावर उपाययोजना केली पाहिजे. कोकणात बुद्धीमत्ता ठासून भरलेली असताना स्पर्धा परिक्षांना आपण सामोरं का जात नाही ? याचेही चिंतन केल पाहिजे. इंजिनीअर, डॉक्टर होत असताना प्रशासकीय सेवेत देखील आपण असलं पाहिजे. राज्याची, देशाची सेवा केली पाहिजे हे धेय्य घेऊन पुढे चला असे आवाहन राज्याचे उपसचिव, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी केले. वैश्य समाज सावंतवाडीच्या माध्यमातून आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते बोलत होते.
सावंतवाडी वैश्य भवन येथे वैश्य ज्ञातीतील १० वी, १२ वी तसेच पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते गुणवंताचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, वैश्य समाज अध्यक्ष रमेश बोंद्रे, उपाध्यक्ष पुष्पलता कोरगावकर, अशोक नाईक आदी उपस्थित होते.
श्री पारकर पुढे म्हणाले, आमची घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचं महत्व ठाऊक होतं. सावंतवाडीत बालपण केलं. आई-वडीलांचे कष्ट मी पाहत होतो. आई शिक्षिका होती पण, वेतन फार अल्प होत. त्यामुळे आपल्याला यशस्वी व्हायच हे धेय्य होत. कष्ट, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर प्रशासकीय सेवेत आलो. मंत्रालयात गेली ३४ वर्ष मी सेवा देत आहे. प्रामाणिकपणा व जिद्द यामुळे राज्यशासनाच्या उपसचिव पदावर मी कार्यरत आहे. मुलांनी प्रशासकीय सेवेचा ही विचार करियरच्या दृष्टीने करावा. स्पर्धा परीक्षांची तयारी यासाठी आजपासून करावी. प्रामाणिकपणे भ्रष्टाचार विरहीत काम केल्यास तुमची पद आणि प्रतिष्ठाही वाढेल असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे यांसह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी भुषविले होते.
यावेळी बाळासाहेब बोर्डेकर, रविंद्र स्वार, नरेंद्र मसुरकर,अँड गोविंद बांदेकर, गितेश पोकळे, समीर वंजारी, अरूण भिसे, साक्षी वंजारी, दीपक म्हापसेकर, संतोष गांवस, आबा केसरकर, अनिल भिसे,सचिन वंजारी, श्री.पोकळे, श्री. नार्वेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश बोंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन संजय म्हापसेकर तर आभार बाळासाहेब बोर्डेकर यांनी मानले.