तळकोकणच्या शिमगोत्सवात संस्कृती आणि परंपरेचे जतन

Edited by:
Published on: March 24, 2024 14:58 PM
views 172  views

दोडामार्ग | संदीप देसाई :  कोकण... अर्थात परशुरामाची सुंदर भूमी. अनेक संस्कृती, अनेक परंपरा आणि अनेक गाव- राहाटी,  सणासुदीचे माहेरघर कोकणला मानले जाते. वेगवेगळ्या संस्कृती, परंपरेचे दर्शन कोकणातील प्रत्येक सणाला गावोगावी पाहावयास मिळते. विशेषतः कोकणच्या शिमगोत्सवात तर या परंपरेचे एक आगळेवेगळे रूप दिसते. जिल्ह्यातील  शिमगोत्सवसुद्धा नानाविध कला, खेळ व परंपरांनी परिपूर्ण आहे. 

यात कुणकेरीचा हुडोत्सव, सांगेलीची आराध्य दैवत गिरिजीनाथाचा गीरोबाचा उत्सव, कुडाळ मधील नेरूर गावी होणारा माण उत्सव, दोडामार्ग मधील झोळंबे येथील नाव्हण उत्सव, हेवाळेतील अनोखा वाघखेळ, वझरेतील गाडा उत्सव, असनिये येथील शिमगोत्सव,  साटेली येथील आगळी वेगळी घोडेमोडणी अशा विविधांगी खेळांनी आणि परंपरेनं कोकणचा शिमगोत्सव साजरा होतो. यावर्षीसुद्धा ही पूर्वापार परंपरा जोपासण्याचे काम येथील नागरिक मोठ्या उत्साहाने करीत आहेत. गावोगावच्या मंदिर ठिकाणी होलिका पूजन झाले नंतर पाच, सात,  अकरा आणि पंधरा दिवसांचा शिमगोत्सव साजरा होत असतो. रंगाचा आणि एकमेकांप्रती जिव्हाळ्याचा असणारा हा सण प्रत्येक कोकण वासियाच्या मनात एक नवचैतन्य निर्माण करून जातो.

कोकणात कुणकेरीच्या शिमगोत्सवाची विशेष क्रेझ

अवघ्या कोकणात सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरीचां शिमगोत्सव विलक्षण कुतूहलदायी बनत चालला आहे. येथेही परंपरेप्रमाणे होळी, घोडेमोडणी आणि लक्षवेधी वाघखेळ हे कार्यक्रम होतात. मात्र सर्वात लक्षवेधी उत्सव या गावी हुडा असतो. २०१२ मध्ये याठिकाणी गगनचुंबी हुड्याची उभारणी करण्यात आली आहे. हा हुडा सागवानी लाकडाचा असून उत्सवा वेळी संपूर्ण हुड्याला आंब्याचे टाळ बांधले जातात. त्यांनतर वाघखेळ होतो. तो झाल्यावर ३ अवसारी पुरुष अगदी लिलया गगनचुंबी हुड्याच्या टोकावर जावून बसतात. आणि त्यांच्यावर मग खाली जमलेले हजारो भाविक दगड मारतात. ज्या व्यक्तीचा दगड या अवसारी पुरुषाला लागेल ते त्यासाठी  भाग्यदायी मानले जाते. वर्षानुवर्षं हा हुडोत्सव कोकणच्या शिमगोत्सवाची शान बनत चालला आहे. 

भक्ती शक्तीचा महिमा वझरे गावचा गाडा उत्सव

दोडामार्ग शहरालगतच्या वझरे या छोट्याशा गावात शिमगोत्सवातला 'गाडा' ओढला जातो. तालुक्यासोबत गोव्यातील अनेक जण या गाडा उत्सव पाहण्यासाठी हजेरी लावतात. वझरे गावातील देवीच्या मंदिरातील कळस व फुले तसेच रंगीबेरंगी वस्रांनी रथ सजविला जातो. सुरुवातीला ढोल-ताशांच्या गजरात मुख्य मानकरी येऊन या रथाची पूजा-अर्चा करतात. त्यानंतर गान्हाणी, अन्य कार्यक्रम झाल्यावर प्रमुख पाच मानकरी येऊन या रथावर विराजमान होतात. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सर्वजण मिळून हा रथ खेचतात. ही खेचा-खेची या गाडा उत्सवाचा मुख्य टर्निंग पॉईंट ठरते. वझरे सोबत खुद्द दोडामार्ग शहरवासीय तसेच गिरोडे, आयी, माटणे, तळेखोल, वीर्डी, आंबडगाव आदी गावांतून असंख्य भाविक या उत्सवाला गदर्दी करतात. भक्ती व शक्की या दोघांचा अनोखा संगम वझरेतील या रथोत्सव अर्थात गाडा उत्सवातून दिसतो. होळीच्या तिसऱ्या दिवशी हा रथोत्सव वझरे गावी मोठ्या थाटात संपन्न होतो.

झोळंबे गावच्या शिमगोत्सवात तर दैवत्वाची प्रचिती

डोक्यावर कलश घेऊन सुसाट वेगानं धावणारा अवसारी पुरूष पाहण्यासाठी तसेच आशीर्वाद घेण्यासाठी उडणारी झुंबड झोळंबे गावच्या शिमगोत्सवात दिसते. हात न धरता डोक्यावर तीर्थाने भरलेला कलश घेऊन धावणारा अवसारी पुरुष व त्याच्यासमोर खाली अंगावर तीर्थ पाडून घेण्यासाठी होणारी भाविकांची धावपळ, होळीच्या आठव्या दिवशी चव्हाटा येथील होळीच्या मांडावरून पाच खेळे गावात सोडण्यासाठी सज्ज झालेले असतात. प्रथम गावातील ९ मानकरी व त्यानंतर इतर ग्रामस्थांच्या घरी खेळ्यांचा कार्यक्रम होतो. त्यावेळीच गाव रोंबाटाला सुरुवात होते. हे रौबाट रात्रीचे होते. दुसन्या दिवशी होळीची गाठभेट होऊन रोंबाटाची सांगता होते. शेवटच्या दिवशी 'नहावाण'ला सुरुवात होते. न्हावण तीर्थ  असलेला कलश डोक्यावर घेतलेला अवसारी पुरुष कलशाला हात न लावता सुसाट पळत असतो. प्रत्येकाच्या घरी गेल्यावर या अवसारी पुरुषाची तसेच कलशाची पूजा होते. त्यावेळीच फक्त हाताने कलश पकडून हा पुरूष खाली झोपलेल्या भाविकांच्या अंगावर विशिष्ट पद्धतीने तीर्थ-न्हावण शिंपडतो. न्हावण घेण्यासाठी प्रत्येक भाविक एका मोठ्या श्रध्देने गावात दाखल झालेला असतो.

हेवाळेत अनोखा वाघखेळ

तिलारी खोऱ्यातील हेवाळे गावचा शिमगोत्सव हा आबालवृद्धांसाठी मोठा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. हेवाळे गावातील शिमगोत्सवात होणारा अनोखा 'वाघखेळ' पाहण्यासाठी झुंबड असते. या गावची ग्रामदेवता मावगवस हा पूर्वी एकाच तळीवर वाघ व शेळी यांना पाणी पाजायचा, अशी आख्यायिका या गावात ऐकायला मिळते. त्या ग्रामदेवतेच्या कृपेने सामध्यर्थ्यांमुळेच या गावात वाघाने शेळीवर हल्ला केला नाही. त्यावरूनच हा वाघखेळ शिमगोत्सवात रुढझाल्याचे गावकरी सांगतात. शिमगोत्सवांतर्गतच्या कार्यक्रमात गावातील एक व्यक्ती वाघाचे कपडे परिधान करून घोडेमोडणी संपताच मंदिराच्या आवारात दाखल होते व वाघसदृश अभिनय करत खेळातून लहान मुले, युवक यांच्यासोबत मनोरंजन केलं जात. या खेळातूनच सर्व भाविक, गावकरी या मंडळींना वर्षभराची  रखवाली हा वाघच देतो. प्रत्येक व्यक्ती या वाघाकडून आपल्या डोक्यावर धुळवड घेत देवतांचा आशीर्वाद घेतात. हेवाळेतील हा वाघखेळमुद्धा खरोखरच पाहाण्यासारखा असतो. 

साटेलीतील घोडेमोडणी लक्षवेधी

६० गावांचे जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या साटेली गावच्या श्री देवी सातेरी शांतादुर्गा देवतांचा वार्षिक शिमगोत्सवातील 'घोडेमोडणी उत्सव' प्रसिद्ध आहे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार येथील घोडेमोडणी उत्सवात अवसारी घोडेस्वार पळण्याची प्रथा असल्याने साटेलीची ही घोडेमोडणी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने संपन्न होते. त्यामुळे हा उत्सव पाहण्यासाठी साटेली दशक्रोशीतील नागरिक प्रचंड गर्दी करतात. 

साळचा गडे उत्सव कोकणवासियांना पर्वणी

तळकोकणच्या शेवटचा तालुका दोडामार्ग. या शहरापासून अवघ्या ४-५ किलोमीटर अंतरावरील साळ गोवा येथील गडे उत्सव हा अनेक कलाप्रेमी तसेच परंपरेशी निगडीत असलेल्यांसाठी औत्सुक्याचा उत्सव ठरला आहे. होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या रात्रीपासून या उत्सवाला सुरुवात होते. अवसारी पुरूष अर्थातच गडे । या गड्यांची आपल्या कोकणात श्रद्धेचे स्थान असलेल्या 'देवचार' अर्थात अदृश्य शक्ती रूपातील मानवी देह असलेल्या व्यक्तीशी गाठभेट होऊन हातात चुडी दाखवत लोकांचे मनोरंजन व त्याचबरोबर कुतूहल निर्माण करणारा हा उत्सव असतो. हा अद्भुत उत्सव पाहण्यासाठी केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रासह मुंबईसारख्या बड्या शहरातून नागरिक शिमगोत्सवाला साळ येथे दाखल होतात. त्यामुळे जवळजवळ ३ ते ४ दिवस साळला अक्षरशः मोठ्या जत्रेचे स्वरूप आलेले असते.

कोकणी माणूस अन् परंपरा

सण आणि विविधांगी उत्सवात अनेक प्रथा व परंपरा आपल्या कोकणात आहेत. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावोगावच्या शिमगोत्सवात आज बदलत्या काळातही त्या प्रथा व परंपरा 'जैसे थे' जपल्या जात आहेत. जिल्हयातील गावागावात पूर्वापार चालत आलेल्या या प्रथा - परंपरां आजही तितक्याच श्रध्देने आणि आस्थेने जपल्या जातात. अलीकडच्या काळात तर  मुंबईत वसलेला चाकरमानी गणेश उत्सव प्रमाणेच शिमगोत्सव साजरा करण्यात साठी सुद्धा गावी दाखल होऊ लागला आहे. गोवा, कर्नाटकसारख्या प्रांतांतून अनेक उत्साही भाविक, नागरिक आवर्जून शिमगोत्सवात उपस्थिती लावतात. यावरून कोकणी माणूस आपल्या परंपरेशी किती जुळला आहे, त्याचेही यथार्थ दर्शन होते. इतकेच नव्हे तर या रंगाच्या सणाने वर्षभर आपल्या कामा धंद्यात व्यापलेला कोकणी माणूस आपल्याच गावकऱ्यांशी आणि समाजाशी एकरूप होत हर्शोलित होताना हमखास दिसतो.